Seattle Center Shooting breaking news : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधील सिएटल सेंटर येथे भीषण गोळीबार झाला असून यात अनेकजण जखमी झाल्याचं वृत्त आहे. या घटनेमुळे तिथे मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून प्रसिद्ध बाइट ऑफ सिएटल महोत्सवाचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. सिएटल पोलीस विभागाने एका निवेदनात या गोळीबाराच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एबीसी न्यूजने यासंदर्भातील वृत्त दिलं.
पोलिसांनी सांगितलं की, “पोलीस गोळीबाराच्या घटनेचा तपास करत आहेत. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. सिएटल सेंटर येथे गोळीबार झाला असून अधिक माहिती लवकरच दिली जाईल. नागरिकांनी कृपया या परिसरात जाणं टाळावं.” सोशल मीडियावरील काही पोस्ट्सनुसार, एका व्यक्तीला बेड्या ठोकून ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र, त्या व्यक्तीचा या गोळीबाराशी संबंध आहे की नाही, याला अधिकाऱ्यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.
बाइट ऑफ सिएटल महोत्सवात गोळीबार
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गोळीबार स्पेस नीडलजवळ सिएटल सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘बाइट ऑफ सिएटल’ महोत्सवात किंवा त्याच्या आसपास झाला. हा सिएटल शहरातील सर्वात मोठ्या वार्षिक खाद्य महोत्सवांपैकी एक आहे. गोळीबाराचं वृत्त समजताच पोलीस, अग्निशामक दल आणि अनेक आपत्कालीन वैद्यकीय पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी परिसर सुरक्षित करेपर्यंत सिएटल सेंटर कॉम्प्लेक्समधील काही भागांतून पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढलं.
संशयित हल्लखोर फरार?
‘कोमो न्यूज’ शी बोलताना प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, त्यांनी गोळीबाराचे अनेक आवाज ऐकले आणि त्यानंतर लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावू लागले. घटनास्थळावरील एका पत्रकाराने सांगितलं की, एका पोलीस अधिकाऱ्याच्या मते संशयित हल्लेखोर अद्याप फरार आहे; मात्र पोलिसांनी अधिकृतपणे संशयिताच्या स्थितीबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही. सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओंमध्ये इंटरनॅशनल फाउंटन आणि स्पेस नीडलच्या आसपासच्या परिसरात मोठ्या संख्येने पोलीस गाड्या, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन पथके जमा झालेली दिसत आहेत. या घटनेतील बळींची अचूक संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही.
तसंच जखमींच्या दुखापतींचं गांभीर्य किंवा गोळीबारामागील संभाव्य हेतू याबद्दलची माहिती अद्याप मिळालेली नाही. याप्रकरणी कोणतीही अधिकृत अटक जाहीर करण्यात आलेली नसून तपास सुरू आहे.
