लोकसत्ता विशेष प्रतिनिधी / वृत्तसंस्था नवी दिल्ली : सेबीच्या अध्यक्ष माधबी पुरी बुच यांनी आरोपांच्या उत्तरादाखल केलेल्या खुलाशात बर्म्युडा, मॉरिशस येथील बनावट फंडांमधील गुंतवणुकीची जाहीरपणे कबुली दिली आहे. आता त्यांनी सिंगापूर आणि भारतामधील सल्लागार संस्थेच्या अशिलांबाबत सर्व माहितीही द्यावी, असे आव्हान ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने सोमवारी दिले. दुसरीकडे, ‘हिंडेनबर्ग’च्या नव्या अहवालावरून भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले. काँग्रेससह विरोधी पक्षांनी संयुक्त संसदीय समितीच्या मागणीसाठी देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला असताना देशात आर्थिक अराजक माजवण्याचे कारस्थान असल्याचा आरोप भाजपने केले. सेबीच्या अध्यक्ष माधबी बुच यांनी हिंडेनबर्ग अहवालातील आरोपांना उत्तर देताना आपल्या चारित्र्यहननाचा प्रयत्न केल्याचे रविवारी म्हटले होते. सोमवारी बूच यांच्या निवेदनाचा ‘हिंडेनबर्ग’ने पंचनामा केला. त्यांच्या उत्तरात अनेक विसंगती असून नवे महत्त्वाचे प्रश्नही निर्माण झाल्याचा दावा ‘हिंडेनबर्ग’ने केला. हेही वाचा >>>Rahul Gandhi portfolio: शेअर बाजाराच्या तेजीवर राहुल गांधींची शंका; मात्र मागच्या पाच महिन्यात स्वतः कमावले ‘इतके’ पैसे २०१७ मध्ये ‘सेबी’च्या सदस्य झाल्यांतर सल्लागार कंपन्या निष्क्रिय झाल्याचे माधबी बुच यांनी म्हटले होते. मात्र, ३१ मार्च २०२४च्या भागधारणेनुसार, माधबी बुच यांची अॅगोरा अॅडव्हायजरी लिमिटेड (इंडिया) कंपनीत ९९ टक्के मालकी आहे आणि ही कंपनी सल्ला सेवेतून उत्पन्न मिळवत असून सक्रिय आहे असे ‘हिंडेनबर्ग’ने म्हटले आहे. दरम्यान, ‘सेबी’ने सोमवारी दोन पानी निवेदन सादर करून माधबी बुच यांचा बचाव केला. त्यांनी वेळोवेळी संबंधित माहिती उघड केली आहे आणि हितसंबंध आड येण्याच्या संभाव्य प्रकरणांमधून स्वत:ला दूर ठेवले आहे, असे ‘सेबी’ने म्हटले आहे. ‘हिंडेनबर्ग’ अहवालावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. या प्रकरणी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, अन्यथा देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसने अन्य प्रमुख विरोधी पक्षांनी दिला आहे. याला भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. काँग्रेस व राहुल गांधी देशात आर्थिक अराजक माजवण्याचे कारस्थान करत असल्याचा आरोप प्रसाद यांनी केला. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा नाकारले. त्यातून धडा घेऊन तरी काँग्रेस ‘टूलकिट’चा वापर करणार नाही अशी अपेक्षा होती. पण, काँग्रेसने देशाच्या विकासाला बाधा पोहोचवण्यासाठी टूलकिट टोळीची पुन्हा मदत घेतली असून शेअर बाजारात गोंधळ उडवून देण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही प्रसाद यांनी केला. हितसंबंध गुंतल्याच्या आरोपांवर ठाम अदानीप्रकरणी सेबीला ज्या गुंतवणूक फंडांचा तपास करण्याचे काम सोपवले होते, त्यामध्ये माधबी बुच यांनी स्वत: गुंतवणूक केलेल्या फंडांचा आणि आमच्या मूळ अहवालात ठळकपणे उल्लेख केलेल्या फंडांचा समावेश होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात एकमेकांचे हितसंबंध गुंतलेले होते, असे ‘हिंडेनबर्ग’चे म्हणणे आहे. अमेरिकेतील व्यापारी जॉर्ज सोरोस हे ‘हिंडेनबर्ग’मध्ये मुख्य गुंतवणूकदार असून ही ‘टूलकिट टोळी’ आहे. ‘सेबी’ने पहिल्या अहवालातील आरोपांसंदर्भात ‘हिंडेनबर्ग’ला नोटीस बजावली होती. त्याला उत्तर देण्याऐवजी त्यांनी नवा अहवाल प्रसिद्ध करून पुन्हा बिनबुडाचे आरोप केले आहेत. संस्थेच्या आरोपांना ‘सेबी’ व ‘सेबी’च्या प्रमुखांनी निरुत्तर केले आहे.- रविशंकर प्रसाद, खासदार, भाजप ‘हिंडेनबर्ग’ अहवालातील आरोप अत्यंत गंभीर आहेत. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अदानी समूह आणि त्याचे अध्यक्ष गौतम अदानी यांना पाठिंबा आहे. कुंपणच शेत खात असल्याचा हा प्रकार आहे. - के. सी. वेणूगोपाल, काँग्रेस सरचिटणीस