पंजाबमधील वातावरण तणावपूर्ण होताना दिसत आहे. मागील २४ तासाच्या आत पंजाबमध्ये धार्मिक पावित्र्य भंग केल्याच्या आरोपावरून दुसरी हत्या झाली आहे. सुवर्ण मंदिरात संतप्त अनुयायांनी आरोपीच्या हाताचे सर्व बोटं मोडली आणि हातांमधील कड्यांनी हल्ला करत जीव घेतला. यानंतर आता कपूरथलामध्ये देखील पावित्र्य भंग केल्याच्या आरोपावरून एका तरूणाची मारहाण करत हत्या करण्यात आलीय. कपूरथला जिल्ह्यातील निजामपूर गावात ही घटना घडली.

कपूरथलामध्ये नेमकं काय झालं?

कपूरथला जिल्ह्यातील निजामपूर गावात रविवारी (१९ डिसेंबर) एका तरुणाला पहाटे ४ वाजता निशान साहिबचं (शिख धर्म ध्वज) पावित्र्य भंग केल्याचा आरोप करत पकडलं. संतापलेल्या जमावाने या तरुणाला मारहाण केली. यानंतर पोलीसही घटनास्थळी आले आणि त्यांनी आरोपी तरुणाला आपल्या ताब्यात घेतलं. मात्र, स्थानिकांनी आपल्यासमोरच आरोपीची चौकशी करावी अशी मागणी केली. यानंतर पोलीस आणि जमावात संघर्ष झाला आणि जमावाने तरुणाला जबर मारहाण केली. यानंतर पोलिसांनी आरोपीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेबाबतचा मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्यात जमाव एका तरुणाला लाठ्याकाठ्यांनी मारताना दिसत आहे.

अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात काय झालं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहरास साहिब पाठ सुरु (संध्याकाळची प्रार्थना) असताना एका अज्ञात व्यक्तीने रेलिंगवरुन उडी मारली आणि कथितपणे गुरु ग्रंथ साहिब यांच्यासमोर ठेवलेल्या तलवारीला हात लावत अपवित्र काम करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तेथील जमावाने तरुणाला बाहेर नेलं आणि बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. 

“आधी बोटं मोडली, मग हाततलं कडं मारून जीव घेतला”

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एसजीपीसी टास्क फोर्सने आरोपी तरुणाला पकडून एका खोलीत नेलं. तेथे त्याची चौकशी करण्यात आली. मात्र, आरोपी तरुणाने माहिती दिली नाही. यानंतर संतप्त अनुयायांनी तरुणाच्या हातांची सर्व बोटं मोडली आणि त्याच्या डोक्यावर हातातील कड्यांनी हल्ला केला. या मारहाणीत तरूण रक्ताने माखला आणि त्याने जीव सोडला.

अमृतसर शहराचे डीजीपी (कायदा आणि सुव्यवस्था) परमिंदर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, “एका २४-२५ वर्षीय तरुणाने पवित्र पुस्तक (गुरु ग्रंथ साहिब) ठेवण्यात आलेल्या ठिकाणी घुसखोरी केली. त्याने तलवारीच्या सहाय्याने अपवित्र काम करण्याचा प्रयत्न केला. त्याला जमावाने पकडून बाहेर नेलं असता बाचाबाची झाली आणि त्यानंतर झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला”.

घटनेचा व्हिडीओ

हेही वाचा : पंजाबमधील सुवर्ण मंदिरात पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न; जमावाकडून मारहाण करत तरुणाची हत्या

मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी ही घटना खेदजनक असून निषेध व्यक्त केला आहे. तसंच याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.