भारतात करोना विषाणूचा दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचा कालावधी १०० दिवस निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच रुग्ण एकदा करोनाच्या संसर्गातून बरा झाल्यानंतर त्याला १०० दिवसांनंतर पुन्हा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे, आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर देशात दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याचे तीन रुग्ण आढळून आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भार्गव म्हणाले, “भारतात करोनाच्या पुनर्संसर्गासाठी १०० दिवसांचा कालावधी लागत आहे. हा कालावधी म्हणजे अँटिबॉडीजचं जीवनमान आहे. अशा प्रकारची पुनर्संसर्गाची भारतात तीन प्रकरणं समोर आली असून यांतील दोन रुग्ण मुंबईतील तर एक अहमदाबादमधील आहे. जागतीक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) जगात सुमारे दोन डझन पुनर्संसर्गाची प्रकरणं समोर आली आहेत. दरम्यान, आम्ही आयसीएमआरचा डेटा तपासत आहोत. तसेच पुनर्संसर्ग झालेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्याशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत.”

कुठल्या वयातील लोकांचा होतोय सर्वाधिक प्रमाणात मृत्यू

दरम्यान, आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, “४५ ते ६० वयोगट असणाऱ्यांमध्ये करोनाच्या संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण ३५ टक्के आहे. आर्थिक घडामोडी सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर या वयोगटातील रुग्णांना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा तरुण वर्ग हा विचार करतो की आपल्या कमी वयामुळे आपलं आरोग्य चांगल आहे, त्यामुळे संसर्ग होणार नाही किंवा ते लवकर बरे होतील. मात्र, लोकांमध्ये असा समज निर्माण होण्यापासून त्यांना रोखलं पाहिजे. भारतात करोनाचा पॉझिटिव्हीटी रेट हा सातत्याने कमी होत आहे. दरम्यान, ८७ टक्के लोक करोनातून बरे झाले आहेत,” अशी माहितीही त्यांनी दिली.

डेटामधून हे देखील समोर आलं आहे की, ४५ ते ६० वर्षे वयाच्या गंभीर आजार असलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक जोखीम आहे. या वयोगटात गंभीर आजार असलेल्या रुग्णांच्या करोनाच्या संसर्गाने मृत्यूचे प्रमाण १३.९ टक्के आहे, तर गंभीर आजार नसणाऱ्यांचे प्रमाण १.५ टक्के आहे. त्याचबरोबर ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्यांचे ५३ टक्के मृत्यू झाले आहेत. तसेच १७ ते २५ वयोगटातील मृत्यूचे प्रमाण १ टक्का आहे.

दरम्यान, सलग ५ दिवस ९ लाखांहून कमी रुग्ण सापडल्याने तसेच रुग्ण पॉझिटिव्ह असण्याचे प्रमाण ६.२४ टक्के असण्याचे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं. जर सावधगिरी बाळगली गेली नाही तर सणांच्या आणि थंडीच्या काळात परिस्थिती बिघडू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.