गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला
येथील सोहना परिसरात असलेल्या रायन इंटरनॅशनल शाळेच्या शौचालयात दुसरीच्या वर्गातील एका विद्यार्थ्यांचा गळा चिरलेला मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे.




सदर विद्यार्थ्यांचे नाव प्रद्युम्न ठाकूर (७) असे असून त्याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह काही विद्यार्थ्यांना दिसला. विद्यार्थ्यांनी याची माहिती शिक्षकांना दिली, त्यानंतर शाळेच्या व्यवस्थापानाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. प्रद्युम्नला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. न्यायवैद्यक तज्ज्ञांसह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. रक्ताचे नमुने आणि बोटांचे ठसे घेण्यात आले असून घटनास्थळी रक्ताने माखलेला एक सुराही मिळाला आहे, असे पोलिसांनी सांगितले. आम्ही या प्रकरणाचा सर्वागाने तपास करीत आहोत, शाळेच्या संकुलात ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्यामधील फुटेजची तपासणी करण्यात येत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कर्मचारी आणि प्रद्युम्नचे वर्गमित्र यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. प्रद्युम्नचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. प्रद्युम्नचे वडील वरुण ठाकूर यांनी शाळेच्या प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. मुलाच्या मृत्यूची माहिती शाळेच्या प्रशासनाने आपल्याला कळविली नाही, असे वरुण यांनी सांगितले. प्रद्युम्नची प्रशासनाने काळजी घेतली नाही, त्याला वेळेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असते तर त्याचा जीव वाचला असता, असे वरुण यांनी म्हटले आहे.