ओमायक्रॉनची दहशत : ‘या’ राज्याच्या राजधानीत ५ जानेवारीपर्यंत कलम १४४ लागू; घराबाहेर पडताना मास्क बंधनकारक

सोशल मीडियावर शांतता भंग करणाऱ्या पोस्ट टाकू नयेत, तसेच पोस्ट होणाऱ्या गोष्टींसाठी ग्रुप अॅडमीन जबाबदार असेल असंही पोलिसांनी म्हटलंय.

Section 144 invoked in Lucknow
प्रशासनाने यासंदर्भातील आदेश जारी केलेत (प्रातिनिधिक फोटो सौजन्य पीटीआय)

ओमायक्रॉन या वेगाने पसरणाऱ्या करोनाच्या नवीन विषाणूची दहशत आणि करोनाचा एकंदरितच वाढता प्रादुर्भाव पाहता उत्तर प्रदेशची राजधानी असणाऱ्या लखनऊ शहरामध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात येत असल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे. या आदेशानुसार शहरामधील रेस्तराँ, हॉटेल, चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स, व्यायामशाळा, मैदाने यासारख्या गोष्टी ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तसेच शहरामध्ये मास्कची सक्ती करण्यात आली आहे.

आता लखनऊमध्ये घराबाहेर पडताना मास्क वापरणं बंधनकारक झालं आहे. तसेच बंद ठिकाणी कोणत्याही कार्यक्रमामध्ये १०० हून अधिक लोकांची उपस्थिती असणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी असं आदेशात म्हटलं आहे. हे आदेश ५ जानेवारी २०२२ पर्यंत असतील असं सांगण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> देशात ओमायक्रॉनचा धोका वाढत असतानाच ओडिशात नऊ शाळकरी मुलं निघाली ‘करोना पॉझिटिव्ह’

कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असणारी जेसीपी पीयूष मोर्डिया यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सर्व ठिकाणी करोना नियमांचं योग्य पद्धतीने पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेत. विधानसभेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यावर बंधनं घालण्यात आली आहेत. रेस्तराँ, हॉटेल, चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स, व्यायामशाळा, मैदाने ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी असल्याचं सांगण्यात आलंय.

नक्की पाहा हे फोटो >> ओमायक्रॉन: हिंसाचार, जाळपोळ, मुलांमधील वाढता संसर्ग अन्…; निर्बंधांच्या भितीने अनेक देशांमधील परिस्थिती चिघळली

तसेच मोकळ्या जागांमधील कार्यक्रमांचे आयोजनही जागेच्या आकारमानानुसार करण्याचे निर्देश देण्यात आलेत. अशा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वाराजवळ करोना हेल्प डेस्क अनिवार्य करण्यात आलाय. तसेच धार्मिक स्थळांच्या ठिकाणी एकाच वेळी ५० हून अधिक जण जमा होण्यावर बंदी घालण्यात आलीय.

नक्की वाचा >> Omicron: लहान मुलांमधील संसर्ग वाढला; उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या ० ते ५ वयोगटातील रुग्णसंख्येत वाढ

शहरामध्ये रात्री १० नंतर लाउडस्पीकर्सवर बंदी घालण्यात आलीय. सरकारी कार्यालयांच्या आसपास ड्रोनने शुटींग करण्यास बंदी घालण्यात आलीय. घराच्या छप्परावर दगड, विटा तसेच ज्वलनशील पदार्थ ठेवू नये असं सांगण्यात आलं आहे. सोशल मीडियावर शांतता भंग करणाऱ्या पोस्ट टाकू नयेत असंही पोलिसांनी म्हटलं आहे. तसेच पोस्ट होणाऱ्या गोष्टींसाठी ग्रुप अॅडमीन जबाबदार असेल असंही पोलिसांनी म्हटलंय. या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Section 144 invoked in lucknow till january 5 scsg