Secunderabad Cantonment AK 47 rifles weapon theft : तेलंगणातील हैदराबादच्या सिकंदराबादमधील लष्करी छावणीच्या कडेकोट सुरक्षा असलेल्या परिसरातून चार एके-४७ रायफलींसह एकूण ११ शस्त्रे चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. चोरीची घटना रविवारी रात्री घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबद्दल सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. चोरीला गेलेल्या शस्त्रांमध्ये चार एके-४७ रायफल्स, सहा पिस्तुले आणि एक आयएनएसएएस रायफल यांचा समावेश आहे. ही शस्त्रे मद्रास रेजिमेंटच्या परिसरातील एका खोलीत ठेवण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, या भागात लष्करी जवानांबरोबर काही नागरी कर्मचारीही ये-जा करतात.
कुलूप आणि दरवाजा तोडून प्रवेश
लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर बोलाराम पोलिसांनी सोमवारी चोरीचा गुन्हा दाखल केला. अज्ञात व्यक्तीने सुरक्षा क्षेत्रात प्रवेश करून खोलीचे कुलूप आणि दरवाजा तोडल्याचा पोलिसांना संशय आहे. गेल्या काही दिवसांत या शस्त्रसाठ्याच्या खोलीत कोण-कोण गेले होते, याची माहिती पोलिसांकडून गोळा केली जात आहे.
लष्कराला ‘आतील व्यक्ती’चा संशय
सुरक्षा व्यवस्थेचे उल्लंघन करून शस्त्रे चोरीला गेल्याने लष्कराला या प्रकरणात आतील व्यक्तीचा सहभाग असण्याचा संशय आहे. या परिसराची सुरक्षा सामान्यतः पाळ्यांवर काम करणाऱ्या सशस्त्र कर्मचाऱ्यांकडून केली जाते. ही चोरी अशा वेळी झाली असावी जेव्हा तिथे केवळ थोडेच सुरक्षा रक्षक उपस्थित होते, असा अंदाज वर्तवला जात आहे. हा परिसर आता बंद करण्यात आला असून तेथील सुरक्षा रक्षक आणि इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे.
सीसीटीव्ही तपासले जात आहेत
पोलिस आणि लष्करी अधिकारी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासत आहेत. चोरीपूर्वी आणि चोरीच्या वेळी संशयित व्यक्तींच्या हालचालीचा शोध घेतला जात आहे. मलकाजगिरी पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारीही तपासात सहभागी झाले आहेत.
“लष्करी रेजिमेंटच्या पूर्ण सहकार्याने तपास सुरू केला आहे,” अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.हरवलेली शस्त्रे शोधण्याचे आणि ही चोरी एखाद्या मोठ्या गुन्हेगारी कटाचा भाग आहे का, याचा तपास करण्याचे कामही संबंधित यंत्रणा करत आहेत.
