जम्मू : जम्मू- काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळच्या एका खेडय़ातील दहशतवाद्यांचा छुपा अड्डा सुरक्षा दलांनी उद्धवस्त केला असून, शस्त्रे व दारूगोळय़ाचा मोठा साठा जप्त केला आहे.

दक्ष असलेल्या सुरक्षा दलांनी शस्त्रसाठा वेळेत जप्त केल्यामुळे, या केंद्रशासित प्रदेशातील शांतता प्रक्रियेत अडथळा आणण्याचा शत्रूचा  डाव  हाणून पाडण्यात आला, असे संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने सोमवारी सांगितले.

लष्कर व पोलिसांच्या संयुक्त मोहिमेदरम्यान हवेली तालुक्यातील नूरकोटे खेडय़ात हा अड्डा शोधून काढण्यात आला. या ठिकाणावरून जप्त करण्यात आलेल्या शस्त्र व दारूगोल्यांच्या साठय़ात दोन एके-४७ रायफली, दोन मॅगझिन व ६३ काडतुसे, एक २२३ बोअरची बंदूक, तिचे दोन मॅगझिन व २० काडतुसे, मॅगझिनसह एक चिनी पिस्तूल आणि ४ काडतुसे यांचा समावेश आहे.

जम्मू- काश्मीरमधील शांतता प्रक्रियेत अडथळा आणण्याची शत्रूची कुटील योजना दक्ष सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा हाणून पाडली आहे, असे या प्रवक्त्याने पाकिस्तानचा नामोल्लेख न करता सांगितले.