दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयामध्ये एक सामान्य नागरिक म्हणून पाहणी करण्यासाठी गेलेल्या देशाच्या आरोग्य मंत्र्यांना रुग्णालयातील सुरक्षारक्षकाने मारहाण केल्याच्या प्रकाराची माहिती समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी काही दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रसंगाबाबत माहिती दिली आहे.

मांडविया हे जेव्हा दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयामध्ये गेले होते, तेव्हा त्यांना एका सुरक्षारक्षकाने बेंचवर बसल्यावर मारहाण केली होती. सफदरजंग रुग्णालयातील एका कार्यक्रमात मांडविया यांनी या घडलेल्या प्रसंगाबाबत माहिती दिली आहे.

सफदरगंज रुग्णालयातील चार आरोग्यविषयक सुविधांच्या उद्घाटन समारंभात मांडविया यांनी ही संपूर्ण घटना उघड केल्याने सर्वांना धक्का बसला. सफदरगंज रुग्णालयात मांडविया यांनी नवीन ऑक्सिजन प्लांट, करोनाच्या उपचारासाठी तयार केलेले तात्पुरते हॉस्पिटल यासह चार सुविधा सुरू केल्या.

मांडविया यांना या तपासणीत रुग्णालयातील असुविधाही पाहायला मिळाल्याचे म्हटले आहे. रुग्णालयामध्ये सुमारे ७५ वर्षांच्या एका वृद्ध महिलेला तिच्या मुलासाठी स्ट्रेचरची गरज होती. पण सुरक्षा रक्षकांनी त्या महिलेला स्ट्रेचर आणून देण्यास किंवा नेण्यास मदत केली नाही असे म्हटले.

रूग्णांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये अशाप्रकारे रुग्णालयात व्यवस्था करावी. जर हॉस्पिटलमध्ये १५०० सुरक्षा रक्षक असतील तर ते वृद्ध स्त्रीला स्ट्रेचर नेण्यात का मदत करू शकत नाहीत असा सवाल मांडविया यांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी आपत्कालीन विभागामध्ये पुरेसे सुरक्षा रक्षक तैनात करावे, असे आदेश त्यांनी दिले आहेत.

या संपूर्ण घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्याचे मांडविया यांनी सांगितले. पंतप्रधानांनी काठीने मारणाऱ्या सुरक्षा रक्षकाला त्यांनी निलंबित केले आहे का? असा प्रश्न केला होता. त्यावर आरोग्य मंत्र्यांनी नाही असे म्हणत त्यांना फक्त एक व्यक्ती नाही तर संपूर्ण व्यवस्था अधिक चांगली करायची आहे, असे सांगितले.

दरम्यान, मांडवियांनी करोनाकाळात डॉक्टरांनी केलेल्या कामाचे कौतुक केले आणि सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे असे म्हटले. हे रुग्णालय आपली प्रतिमा बदलण्यासाठी प्रेरणा म्हणून काम करेल असेही आशा त्यांनी व्यक्त केली.