जागतिक महासत्ता समजल्या जाणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या स्वागताची जय्यत तयारी दिल्लीत सुरू आहे. ओबामा यांच्यासाठी खास भारतीय खाद्यपदार्थाची मेजवानी तर सौ. मिशेल बराक ओबामा यांना बनारसी शालू भेट देण्यात येणार आहे. ओबामा यांच्या दौऱ्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बराक ओबामा भारतात दाखल होतील. राजकीय शिष्टाचाराचे संकेत बदलून पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबामा यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जाण्याचे वृत्त आहे.
बराक ओबामा रविवारी (दि. २५) भारतात दाखल होतील. तेथून ओबामा यांचा ताफा राष्ट्रपती भवनात पोहोचेल. राष्ट्रपती भवनात त्यांचे स्वागत करण्यात येईल. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी ओबामा राजपथावर जातील. दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी बराक ओबामा यांच्यादरम्यान वार्ता होईल. रात्री ओबामा यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात मेजवानी आयोजित करण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनी (दि. २६) सकाळी साडेनऊ वाजता ओबामा, पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ‘अमर जवान ज्योत’वर पुष्पहार अर्पण करतील. रात्री उशीरा राष्ट्रपती भवनात ‘अ‍ॅट होम’ कार्यक्रमात ओबामा सहभागी होतील. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी व ओबामा यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण करण्यात येणार आहे.

मंगळवारी (दि. २७) सकाळी ओबामा भारतातील निवडक महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणार आहेत.  त्यात उद्योजकांचा सर्वाधिक भरणा असण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुपारी ओबामा आग्रा येथे रवाना होतील.   
ओबामा यांच्या दौऱ्यावर भारत एकूण एक हजार कोटी रूपये खर्च करणार आहे. त्यातील सर्वाधिक भाग सुरक्षा व्यवस्थेवर खर्च होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सुमारे १०० मिनिटांपेक्षाही जास्त काळ ओबामा उपस्थित राहणार आहे. संचलन होणाऱ्या राजपथाचे १३ भाग करण्यात आले आहे. प्रत्येक भागासाठी एक वरिष्ठ सुरक्षा अधिकारी प्रमुख असेल. शुक्रवारी रात्रीपासूनच ल्यूटियन्स झोनच्या परिसराचा ताबा सुरक्षारक्षकांनी घेतला आहे.