गरीबांवर, दलितांवर, शेतकऱ्यांवर हल्ला हाच भाजपाचा खरा चेहरा-प्रियंका गांधी

या दडपशाहीविरोधात काँग्रेस निकराने लढा देणार

गरीबांवर हल्ला, दलितांवर हल्ला, शेतकऱ्यांवर हल्ला, लोकशाहीवर हल्ला हाच आहे भाजपाचा खरा चेहरा आणि चरित्र. याविरोधात काँग्रेस निकराने लढा देणार अशी टीका काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करत व्हिडीओपुढे या ओळी लिहिल्या आहेत. या व्हिडीओत काही लोकांना पोलीस अमानुषपणे मारत आहेत. जो कुणी मधे पडेल त्यालाही फटके देत आहेत असं दिसून येतंय. हा व्हिडीओ पोस्ट करुन त्यांनी मध्यप्रदेश सरकारवर टीकेचे बाण चालवले आहेत. भाजपाचा हा खरा चेहरा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

मध्यप्रदेशातील गुना या ठिकाणी एका शेतकरी कुटुंबावर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. ज्यामुळे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे असं सांगणाऱ्या मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं आहे. मंदसौरमध्ये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. हाच व्हिडीओ प्रियंका गांधी यांनी पोस्ट केला आहे. भाजपाचा हा खरा चेहरा असल्याची टीका त्यांनी केली आहे.

बुधवारी सोशल मीडियावर एका शेतकरी दाम्पत्याला पोलीस अत्यंत अमानुषपणे मारहाण करत आहेत हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि शिवराज सिंग चौहान सरकारवर टीका होण्यास सुरुवात झाली. एका शेतकरी दाम्पत्याला पोलिसांनी मारहाण केली. या व्हिडीओत त्यांना काही लोक वाचवण्याचाही प्रयत्न करत होते. मात्र त्यांनाही पोलिसांनी मारहाण केली. याच प्रकारावरुन प्रियंका गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: See the real face of bjp says congress leader priyanka gandhi scj