पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत

अहमदाबाद : स्वातंत्र्योत्तर काळात देशात स्वस्त अन्नधान्य वाटपाच्या योजना आणि त्यासाठीचा निधी यात उत्तरोत्तर वाढ होत गेली, मात्र अकार्यक्षम वितरण यंत्रणा आणि स्वार्थी घटकांमुळे त्याचा गरिबांना पाहिजे तसा लाभ मिळू शकला नाही, असे निरीक्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नोंदवले.

गेल्या काही वर्षांत देशात अन्नधान्याचा साठा वाढत गेला, पण लोकांची उपासमार आणि कुपोषण हे त्या प्रमाणात कमी झाले नाही, असे मोदी म्हणाले. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या गुजरातमधील लाभार्थ्यांशी मोदी यांनी आभासी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी वरील मत व्यक्त केले.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा करोनाकाळात नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर लाभ झाला. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांची भाकरीची चिंता दूर झाली, असे मोदी यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत करोना महासाथीच्या काळात ८० कोटींहून अधिक नागरिकांना मोफत धान्यवाटप करण्यात आले. त्यासाठी दोन लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळास पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मोदी यांनी हा संवाद साधला.

करोनामुळे रोजगार धोक्यात आले, टाळेबंदीमुळे उद्योग-व्यवसायांवर परिणाम झाला. देशावर शतकातील हे सर्वात मोठे संकट आले असताना कोणीही नागरिक उपाशी राहणार नाही, याची दक्षता आम्ही घेतली, असे मोदी म्हणाले.

लसीकरणाचे आवाहन

या कार्यक्रमात पंतप्रधानांनी नागरिकांना करोनाप्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन केले. लोकांना मुखपट्टीचा वापर, आंतरनियमन, गर्दी टाळणे या उपाययोजनांचे पालन करावे, असे ते म्हणाले. देशात ५० कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य वेगाने साध्य करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

यंत्रणेत काही दोष निर्माण झाला आहे. काही स्वार्थी घटक यात घुसले आहेत. ही व्यवस्था बदलण्यासाठी २०१४ नंतर आम्ही नव्या पद्धतीने काम सुरू केले. योजनेतील खोटे लाभार्थी काढून टाकण्यासाठी नवे तंत्रज्ञान वापरण्यात आले. शिधापत्रिकांशी आधारकार्ड जोडण्यात आले. सरकारच्या स्वस्त धान्य दुकानांत डिजिटल यंत्रणा बसविण्यात आली.

-नरेंद्र मोदी, पंतप्रधान