नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असतानाच जगाचा भारतावरील विश्वासही दृढ होत आहे. अशा स्थितीत अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या सेमीकंडक्टर उद्योग क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता भारत विकसित करत आहे. ज्या कामासाठी अनेक देशांना दोन-तीन दशकांचा कालावधी लागला, त्या क्षेत्रात भारताने अवघ्या काही वर्षांतच यश संपादन केले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभाग आणि इंडिया सेमीकंडक्टर मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘सेमीकॉन इंडिया-२०२६’चे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. विश्वकर्मा जयंतीचा संदर्भ देत मोदी यांनी सांगितले की, भारतात हजारो वर्षांपासून निर्माण करण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर २१व्या शतकातील नव्या तंत्रज्ञानाच्या विकासाची क्षमताही देशाकडे आहे. या दोन्ही बाबींमुळे भारताच्या आत्मनिर्भर होण्याच्या प्रक्रियेला अधिक वेग मिळत आहे.

‘सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांतच भारताच्या प्रगतीचे प्रतिबिंब उमटले. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत कठीण काळ असतानाही भारताने ७.१ टक्के जीडीपी विकासदर कायम ठेवला. सुमारे ३५ वर्षांनंतर जपानच्या क्रेडिट रेटिंग संस्थेने भारताचे सुधारित रेटिंग जाहीर केले. अलीकडेच झालेल्या ब्रिक्स संमेलनात ‘नवी दिल्ली डिक्लेरेशन’ सर्वानुमते मंजूर झाले. या सर्व गोष्टी भारतावरील जगाचा वाढता विश्वास दर्शवतात,’ असे मोदी म्हणाले.

२०२२ मध्ये झालेल्या पहिल्या सेमीकंडक्टर परिषदेत या क्षेत्रातील धोरणावर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या काही वर्षांत भारत व्यावसायिक उत्पादनासाठी सज्ज झाला आहे. सेमीकंडक्टर हे सोपे क्षेत्र नाही. या क्षेत्राचा पाया उभारण्यासाठी अनेक देशांना बराच कालावधी लागला. मात्र, भारताने काही वर्षांतच या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे, असे मोदी यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’चा विस्तार होत असताना सेमीकंडक्टर चिपची मागणीही वेगाने वाढणार आहे. त्यामुळे सेमीकंडक्टर उद्योगासाठी आवश्यक असलेल्या इतर पूरक उद्योगांच्या विकासावरही भारत लक्ष केंद्रित करत आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सेमीकंडक्टर क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांच्या संचालकांनीही मनोगत व्यक्त करत भारताच्या विकासगतीचे कौतुक केले. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सेमीकॉनमधून एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सायंकाळी पत्रपरिषद घेत सेमीकॉन इंडिया २०२६ च्या माध्यमातून सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची माहिती दिली. सेमीकॉन २.० या उपक्रमातून एक लाख लोकांना रोजगार प्राप्त होणार असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र कोणत्या कंपन्यांनी ही गुंतवणूक केली किंवा त्यांची संख्या किती, याबाबत वैष्णव यांनी माहिती देण्यास नकार दिला. सेमीकंडक्टर उद्योग फार क्लिष्ट प्रकारचा असून जर हा सोपा असता तर अनेक देशांनी यात आघाडी घेतली असती. अमेरिकेने अनेक दशकापूर्वीच याचे इकोसिस्टीम तयार केले आहे. दुसरीकडे, भारताने जवळपास शून्यातून सुरुवात केली. त्यामुळे सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रत्येक देशाची वेगळी कथा आहे आणि त्याची तुलना करणे योग्य नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. दरम्यान, एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक पुढील २ ते ३ वर्षात अपेक्षित असून सेमीकॉन १.० प्रमाणेच सेमीकॉन २.० ही नियोजित सहा वर्षाच्या कालावधीपूर्वीच पूर्ण होईल, अशी अपेक्षा वैष्णव यांनी व्यक्त केली. पत्रपरिषदपूर्वी भारतातील आणि परदेशातील विविध कंपन्यांमध्ये १६ एमओयू करण्यात आले.

एक लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

’सेमीकंडक्टर मिशनचा आता दुसरा टप्पा सुरू झाला असून, या माध्यमातून १३.५ अब्ज डॉलरचे क्षेत्र उभारण्याचा प्रयत्न आहे. सेमीकंडक्टर उद्योगाच्या गरजा लक्षात घेता देशातील एक लाख अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना या क्षेत्रासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

’त्यापैकी ७० हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम पूर्ण झाले आहे, असे मोदी यांनी सांगितले. नव्या संशोधनासाठी देशातील तसेच अन्य देशांतील तरुणांनी पुढे यावे आणि भारताच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.