शिवसेनेत दुसऱ्यांदा बंड झालं आहे आणि सहा खासदार फुटले आहेत हे आता सगळ्या देशाला समजलं आहे. दरम्यान या खासदारांची भूमिका समोर आलेली नाही. अशात आता उद्धव ठाकरेंबाबत एक माहिती खासदारांनी ओम बिर्लांना लिहिलेल्या पत्रात नमूद केल्याची सूत्रांची माहिती आहे. यावेळी जी फूट पडली आहे ती मागील चार वर्षात पडलेली दुसरी फूट आहे. आज झालेल्या शिवसेनेच्या बैठकीलाही सहा खासदार अनुपस्थित होते. त्यानंतर आता ओम बिर्ला यांना खासदारांनी जी तक्रार केली त्याबाबतची माहिती समोर आली आहे.
काय म्हटलं आहे बंडखोर खासदारांनी?
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे एकूण ९ खासदार आहेत, त्यापैकी ६ खासदार हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी होतील हे जवळपास निश्चित मानलं जातं आहे. या खासदारांनी ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि त्यांना हे सांगितलं की २०२२ पूर्वीची शिवसेना होती ती आपल्या मूळ विचारांपासून बाजूला गेली आहे. त्यामुळे आम्हाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता द्यावी. एवढंच नाही या खासदारांनी असा दावा केला आहे की ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांनी असा निर्णय घेतला होता की भविष्यात काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला होता. ही योजना समजल्यानेच आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असं या खासदारांनी ओम बिर्लांना सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे. या खासदारांचा रोख उद्धव ठाकरे यांच्याकडेच होता पण त्यांनी त्यांचं थेट नाव घेतलेलं नाही. तसंच याबाबत अधिकृत विधान समोर आलेलं नाही एनडीटीव्हीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

२०२२ च्या बंडाची आठवण करुन देणारा घटनाक्रम
उद्धव ठाकरेंचा पक्ष दुसऱ्यांदा फुटला असून हा सगळा घटनाक्रम २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं होतं अगदी तसाच आहे. एकनाथ शिंदे हे २१ जूनला विधान परिषद निवडणूक पार पडल्यानंतर सुरतला गेले होते, त्यानंतर गुवाहाटीला गेले होते. त्यांना ४० आमदारांची साथ लाभली होती. ज्यानंतर कांँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि ते सरकार कोसळलं होतं. पुढे भाजपाच्या पाठिंब्यावर अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी त्यांची कारकीर्द पार पाडली. एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे मूळ विचारांपासून दूर गेले असा आरोप केला होता. तसंच आमदारांना ते भेटत नाहीत, त्यांच्या समस्या जाणून घेत नाहीत, ऐकून घेत नाहीत असेही विविध आरोप केले होते.आता सूत्रांच्या हवाल्याने ज्या बातम्या समोर येत आहेत त्यातही खासदारांनी ओम बिर्ला यांना दिलेल्या पत्रात नाराजीचा सूर आळवल्याचं समजतं आहे.
६ बंडखोर खासदार राजस्थानात?
६ बंडखोर खासदार नेमकं कुठे आहेत? याबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. आता याबाबतच शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. या ६ बंडखोर खासदारांना दिल्लीमधून काल रात्री राजस्थानमधील एका ठिकाणी हलविण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी आज (१८ जून) माध्यमांशी बोलताना केला आहे. तुम्ही ज्याला फूट म्हणता, त्याला आम्ही फूट म्हणत नाही, तर त्याला आम्ही गद्दारी आणि बेईमानी म्हणतो. हे सगळे लोक पैशाने विकत गेलेले आहेत. मी दोन दिवसांपूर्वी बोलताना म्हटलं होतं की एका-एका खासदाराला १५-१५ कोटी दिले. त्यानंतर आज सकाळी या ६ बंडखोर खासदारांना हॉटेल लीलामधून राजस्थानमधील एका ठिकाणी नेण्यात आलेलं आहे”, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
