शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फळी निर्माण झाली आहे. ४० पेक्षा जास्त आमदारांच्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. हे सगळे बंडखोर आमदार सध्या आसामध्ये वास्तव्यास आहेत. महाराष्ट्रात सुरु असलेल्या या राजकीय घमासानात आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उडी घेतली आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पश्चिम बंगालमध्ये पाठवा, आम्ही त्यांचा चांगला पाहुणचार करु, असं म्हणत ममतांनी भाजपाला टोला लगावला आहे.

हेही वाचा – Maharashtra Political Crisis: खरी शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेंची की तुमची?; एकनाथ शिंदे यांनी दिलं उत्तर; म्हणाले…

महाराष्ट्रात राजकीय घमासानात ममतांची उडी
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. सुरुवातीला एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह सूरतला गेले होते. आता शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह आसाममधील गुवाहाटीमध्ये वास्तव्यास आहे. गुरुवारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबलेल्या हॉटेलबाहेर आंदोलन केले होते. महाराष्ट्रात राजकीय घमासान सुरु असताना आता ममता बॅनर्जी यांनी यात उडी घेतली आहे.

हेही वाचा – ‘ईडी’तर्फे सोनिया गांधींना जुलैअखेपर्यंत मुदतवाढ

ममतांचा भाजपावर हल्लाबोल
भाजपा असैंविधानिक मार्गाने महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याच प्रयत्न करत असल्याचा आरोप ममता यांनी केला आहे. भाजप आता सत्तेचा दुरुपयोग करून इतर पक्ष फोडत आहे, एक दिवस अन्य कोणी तुमचाही पक्ष फोडेल,’ अशी टीका ममता बॅनर्जी यांनी भाजपावर केली. आसाममध्ये सध्या पूरस्थिती आहे तरीही महाराष्ट्रातील आमदारांना तिथे ठेवण्यात आले आहे. भाजपा त्या ठिकाणच्या लोकांचा विचार करत नसल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच या मागे भाजपाचाच हात असून बंडखोर आमदारांना भाजपाकडूनच आर्थिक मदत करण्यात येत असल्याचा दावा ममता यांनी केला आहे.

संजय राऊत यांचे बंडखोर आमदारांसाठी ट्विट
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी २४ तासांमध्ये मुंबईत दाखव व्हावे आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी, असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. त्यानंतर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तुमच्या मागणीचा विचार करण्यात येईल असेही राऊत म्हणाले. चर्चेतून मार्ग निघू शकतो, चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र! अशा आशयाचं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.