सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. बहुतांश वेळा हे सायबर भामटे ज्येष्ठ नागरिकांनाच आपलं टार्गेट बनवत असतात. याची अशी उदाहरणं आपण यापूर्वी पहिलीच आहेत. आता मुंबईत असाच एक धक्कादायक प्रकार पुन्हा समोर आला आहे. सायबर भामट्याने एका ७० वर्षीय निवृत्त आयएएस अधिकाऱ्याची तब्बल ४.५० लाखांची फसवणूक केली आहे. विमानाचं तिकीट रद्द केल्यानंतर ३३ हजारांचा रिफंड मिळवण्यासाठी सुरु असलेल्या प्रक्रियेदरम्यान या ज्येष्ठ नागरिकाची ही फसवणूक करण्यात आली आहे.

पीडित ज्येष्ठ नागरिकाने महाराष्ट्रात अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) म्हणून काम केलं होतं. २० सप्टेंबर रोजी त्यांनी फसवणूक आणि हॅकिंगसंदर्भात मरीन ड्राइव्ह पोलिसांकडे एफआयआर दाखल केला आहे. या पीडित व्यक्तीने पोलिसांना सांगितलं की, कोलकात्याला जाण्याकरिता मी स्वतःची आणि कुटुंबातील सदस्यांची राऊंड ट्रिप एअर तिकिटं बुक केली होती. परंतु, त्यानंतर काही कारणास्तव आम्ही बुकिंग रद्द केली. यावेळी इंटरनेटवर संबंधित ऑनलाईन ट्रॅव्हल कंपनीचा शोधत घेत असतानाच त्यांना संपर्क तपशीलांसह एक बनावट वेबसाईट दिसली, असं त्यांनी तपास अधिकाऱ्याला सांगितलं.

जेव्हा पीडित व्यक्तीने त्या वेबसाईटवरील संपर्क क्रमांक डायल केला आणि रिफंड मागितला तेव्हा दुसऱ्या बाजूच्या व्यक्तीने त्यांच्याकडे त्यांच्या क्रेडिट कार्डचा तपशील विचारला. तेव्हा या व्यक्तीने हा तपशील शेअर करण्यास नकार दिला. परंतु, पुढे या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने पीडिताला एक स्क्रीन-शेअरिंग अॅप डाउनलोड करण्यास सांगितलं. याचमार्फत त्या सायबर भामट्याने या व्यक्तीच्या स्क्रीनवर प्रवेश मिळवला”, असं संबंधित पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.