काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन झालं आहे. ते ८० वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर मंगळुरूतील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ऑस्कर फर्नांडिस यूपीए सरकारच्या काळात रस्ते आणि वाहतूक मंत्री होते. सध्या ते राज्यसभेचे खासदार होते. यूपीए सरकारच्या कार्यकाळात मंत्री असलेले ऑस्कर फर्नांडिस हे गांधी कुटुंबासोबत दीर्घकाळापासून काम करत होते. ऑस्कर फर्नांडिस काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. ते राजीव गांधीचे संसदीय सचिव होते.

यावर्षी जुलै महिन्यात ऑस्कर फर्नांडिस यांची ब्रेन सर्जरी झाली होती. त्यानंतर ते कोमामध्ये होते. ऑस्कर फर्नांडिस योगाभ्यास करताना डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. घरी योगा करत असताना खाली पडल्याने आणि डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काँग्रेस पक्षानं माजी केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांच्या निधानावर शोक व्यक्त करत ट्वीट केलं आहे.

ऑस्कर फर्नांडिस यांचा जन्म २७ मार्च १९४१ रोजी कर्नाटकातील उडप्पी येथे झाला होता. १९८० मध्ये ते कर्नाटकच्या उडप्पी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर १९९६ पर्यंत ते सलग निवडून आले. त्यानंतर १९९८ मध्ये काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवलं. तेव्हापासून आतापर्यंत ते राज्यसभेत खासदार होते.