महेश सरलष्कर, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उदयपूर : भाजपच्या हिंदूत्वाशी कसे लढायचे याची वैचारिक स्पष्टता काँग्रेसच्या तीन दिवसांच्या चर्चेतून अपेक्षित होती, पण पक्षाकडून नीटपणे मांडणी केली गेली नाही, अशी परखड टीका ‘नवसंकल्प’ चिंतन शिबिरात सहभागी झालेल्या व राष्ट्रीय स्तरावर सक्रिय राहिलेल्या ज्येष्ठ नेत्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना केली.

चिंतन शिबिरात सौम्य हिंदूत्वाच्या मुद्दय़ावर भरपूर चर्चा झाली, पण त्यातून निष्कर्ष काहीच निघाला नाही. काँग्रेसच्या सौम्य हिंदूत्वामुळे अल्पसंख्याक समाज पक्षावर कमालीचा नाराज आहे. नजीकच्या काळात त्यांना पर्यायी राजकीय पक्ष मिळाला तर, अल्पसंख्य समाज काँग्रेसकडे परत येण्याऐवजी पर्यायाची निवड करेल. काँग्रेसला जनाधार वाढवायचा असेल तर, सौम्य हिंदूत्वाचा आधार कितपत उपयोगी पडेल, याचा विचार व्हायला हवा होता, असा मुद्दा या नेत्याने मांडला.

भाजपचा पराभव करणे हे काँग्रेसचे प्रमुख लक्ष्य आहे, पण प्रादेशिक पक्ष भाजपचा पराभव करू शकत नाहीत, असे विधान माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाषणात केले. राहुल यांनी काँग्रेसच्या प्रादेशिक पक्षांच्या आघाडय़ांसदर्भातील वक्तव्यावरही टिप्पणी करताना ज्येष्ठ नेते म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर प्रादेशिक पक्ष काँग्रेसला पर्याय होऊ शकत नाहीत, हे पक्ष राष्ट्रीय स्तरावर भाजपचा पराभवही करू शकत नाहीत; पण प्रादेशिक पक्षांनी त्यांच्या-त्यांच्या राज्यांमध्ये भाजपला पराभूत केलेले आहे, ही बाब नजरेआड करता येत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रादेशिक पक्षांचे महत्त्व कमी होत नाही!

मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश अशा काही राज्यांमध्ये काँग्रेसची भाजपशी थेट लढत होईल; पण या राज्यांमध्येही आता आम आदमी पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे ठरवले आहे. या राज्यांमध्ये दुरंगी लढत होती, तिथे ‘आप’मुळे तिरंगी लढत होऊ शकेल, अशा नव्या आव्हानांचाही विचार करून काँग्रेसने निवडणुका लढवल्या पाहिजे, असे माजी मंत्री म्हणाले. 

वातावरण बदलले असते!

पक्षाध्यक्ष पदासाठी निवडणूक होईल, त्यातून नवा अध्यक्ष ठरेल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे पक्षाध्यक्षाचा विषय चिंतन शिबिरात चर्चा करण्याजोगा नव्हता; पण तीन दिवसांच्या चर्चेमध्ये राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारण्याबाबत अनुकूलता दाखवली असती तर तातडीने पक्षात ऊर्जा निर्माण होऊ शकली असती, पक्षातील वातावरण बदलून गेले असते; पण तसे झालेले नाही. त्यांनी पक्षाध्यक्षपदाबाबत कोणतीही उत्सुकता दाखवली नाही. आता निवडणुकीत काय होईल ते बघायचे, असे मत राष्ट्रीय नेत्याने व्यक्त केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior congress party leaders criticized on chintan shivir zws
First published on: 16-05-2022 at 01:39 IST