Journalist Vinod Dua : ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचं निधन

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचं वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्यावर दिल्लीतील अपोलो रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू होते.

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचं वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्यावर दिल्लीतील अपोलो रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू होते. त्यांना २९ नोव्हेंबर रोजी तब्येत बिघडल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ३० नोव्हेंबरला त्यांची मुलगी अभिनेत्री मल्लिका दुआने वडिलांची तब्येत बिघडल्याची माहिती दिली होती. आताही मल्लिकाने इंस्टाग्राम पोस्ट करत वडिलांच्या मृत्यूची माहिती दिली.

मल्लिकाने आपल्या वडिलांच्या मृत्यूची माहिती देताना इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं, “आमचे निर्भय आणि असामान्य व्यक्तिमत्व असलेले वडील विनोद दुआ यांचं निधन झालं आहे. ते अतुलनीय जीवन जगले. त्यांनी एका निर्वासितांच्या वसाहतीपासून तर मागील ४२ वर्षांपासून पत्रकारितेच्या शिखरावर जाऊन काम केलं. ते कायम सत्तेसमोर खरं बोलले. ते आता स्वर्गात आमची आई आणि त्यांची पत्नी चिन्ना यांच्यासोबत असतील. तेथे ते एकमेकांच्या सोबतीनं गाणं गातील, स्वयंपाक करतील, प्रवास करतील.”

“त्यांच्यावर उद्या दिनांक ५ डिसेंबर रोजी लोधी स्मशानभूमी येथे दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार होतील,” असंही मल्लिका दुआने नमूद केलं.

पत्नीचा करोनाने मृत्यू

विनोद दुआ यांना या वर्षी सुरुवातीला करोना संसर्ग झाल्याचंही समोर आलं होतं. जून २०२१ मध्ये त्यांच्या पत्नी रेडिओलॉजिस्ट पद्मावती चिन्ना दुआ यांनाही करोना संसर्ग झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.

कोण आहेत विनोद दुआ?

विनोद दुआ यांनी १९७४ मध्ये दूरदर्शनपासून कामाला सुरुवात केली. पुढे त्यांनी एनडीटीव्ही, सहारा अशा इतरही वृत्तवाहिन्यांसोबत काम केलं. काही काळाने त्यांनी स्वतःची प्रोडक्शन कंपनी काढून विविध वृत्तवाहिन्यांसाठी कार्यक्रम सादर केले.

विनोद दुआ यांचा जन्म तेव्हाच्या डेरा इस्माईल खान आणि सध्याच्या पाकिस्तानातील खैबर-पख्तुन्वा प्रांतातला आहे. त्यांचं बालपण निर्वासितांच्या छावणीत गेलं. त्यांनी बोफोर्स प्रकरणात घेतलेल्या विविध मंत्र्यांच्या मुलाखती चांगल्याच गाजल्या. त्यांच्या पत्रकारितेतील कामासाठी त्यांना रामनाथ गोएंका आणि पद्मश्री अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलंय.

इंस्टाग्राम पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?

मल्लिका दुआने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं होतं, “रात्री बाबांना अपोलो रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची अधिक चांगली काळजी घेतली जाईल. त्यांची तब्येत अतीशय नाजूक आहे. ते त्यांच्या संपूर्ण आयुष्यात एक लढाऊ व्यक्ती होते. त्यांनी कधीही तडजोड केली नाही. याबाबतीत ते आपल्या कुटुंबाची वेळ आली तेव्हाही तसेच राहिले.”

“मी आणि माझी बहिण ठीक आहोत. आमचं पालनपोषण खूप कणखरपणे केलंय. त्यामुळे आम्ही बाबांची पूर्ण काळजी घेऊ. डॉक्टरांच्या सकाळच्या तपासणीनंतर जी माहिती येईल ती मी नंतर माध्यमांना देईल,” असंही मल्लिकाने नमूद केलं होतं. यावेळी तिने तिच्या आईविषयी देखील आठवण काढली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Senior journalist vinod dua passes away in apollo hospital delhi pbs

Next Story
तामिळनाडू सरकारचं भाषाप्रेम! सरकारी नोकरी मिळवण्यासाठीचा ‘हा’ नवा नियम जाणून घ्या…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी