महसूल सेवेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची कबुली या प्रकरणातील आरोपीने गुरुवारी दिली. त्यानंतर न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. राहुल मीणा असे या १९ वर्षीय आरोपीचे नाव असून तो पूर्वी या अधिकाऱ्याच्या घरी गृहसेवक म्हणून काम करत होता. बुधवारी सकाळी घडलेल्या गुन्ह्याप्रकरणी त्याला बुधवारी उशिरा अटक करण्यात आल्यानंतर गुरुवारी न्यायदंडाधिकारी दीपिका ठाकरन यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
आरोपी राहुलची न्याय-वैद्यकीय तपासणीत त्याला जखमा झाल्याचे आढळले होते. त्याविषयी विचारले असता त्याने गच्चीतून खाली येत असताना जखमी झाल्याचा दावा केला. मात्र, अधिक चौकशी केल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला. “माझ्याकडून गुन्हा झाला, चूक झाली,” असे तो म्हणाला. हा गुन्हा करण्याचे कारण विचारले असता, “लॉकर उघडण्यासाठी मृताच्या बोटांचे ठसे हवे होते,” असे आरोपीने सांगितले. या प्रकरणातील मृत मुलगी दिल्ली आयआयटीची पदवीधारक होती आणि ती यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करत होती. .
पीडित मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर आरोपी राहुलने तिच्यावर बलात्कार केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यानंतर त्याने तिला खालील मजल्यावर ओढत नेले आणि तिच्या बोटांच्या ठशांचा वापर करून लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने स्क्रूड्रायव्हरचा वापर करून लॉकर उघडले आणि त्यातील पैसे आणि दागिने चोरले.
राहुल मीणाने घृणास्पद गुन्हा केल्याचे नमूद करून दिल्ली पोलिसांनी त्याची चार दिवसांची कोठडी मिळावी यासाठी अर्ज केला होता. मृत मुलीचा मोबाइल फोन शोधणे, आरोपीचा घरामध्ये प्रवेश करण्याचा आणि बाहेर जाण्याचा मार्ग निश्चित करणे आणि या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी होते का याचा शोध घ्यायचा आहे, असे फिर्यादी पक्षाने न्यायालयाला सांगितले. राजस्थानच्या अलवारमध्येही आरोपीविरोधात अशाच प्रकारचा गुन्हा दाखल आहे. त्याचाही तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पश्चात्तापाचा अभाव
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल मीणाला कोणताही पश्चात्ताप झालेला नाही आणि त्याने जबाब वारंवार बदलला आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणाचा वापर करून केलेल्या तपासावरून असे आढळले आहे की, आरोपीने सकाळी ६.४९ वाजता अधिकाऱ्याच्या घरात प्रवेश केला आणि तो थेट गच्चीवरील अभ्यासाच्या खोलीत गेला. तिथे त्याने मोबाइल चार्जरच्या वायरने मुलीचा गळा आवळला आणि त्यानंतर जड वस्तून तिच्यावर हल्ला केला.
त्यानंतर त्याने तिचा रक्ताळलेला देह ओढत खालील मजल्यावरील लॉकर असलेल्या खोलीत आणला. चोरी केल्यानंतर त्याने आपले रक्ताचे डाग असलेले कपडे आणि चपला बदलल्या आणि ७.२० वाजता पसार झाला. तो गुन्ह्याच्या ठिकाणी सुमारे ४० मिनिटे होता. तो पळून गेल्यानंतर सुमारे ३० मिनिटांनी मृत मुलीचे पालक घरी परतले. राहुल मीणा अधिकाऱ्याच्या घरी आठ महिने गृहसेवक म्हणून काम करत होता. त्याला एका महिन्यापूर्वी कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्याला अधिकारी आणि त्यांच्या पत्नीची दिनचर्चा माहीत होती.
