मुंबई : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लष्करी संघर्षामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती पसरली आहे. यामुळे २ मार्चला निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळल्याचे दिसून आले.

या घसरणीमुळे व्यवहाराच्या पहिल्या काही मिनिटांत गुंतवणूकदारांचे आठ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. कारण बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रातील ४६३.५० लाख कोटी रुपयांवरून ४५५ लाख कोटी रुपयांवर घसरले. दुपारी १:४० वाजता, सेन्सेक्स १,५७९.४० अंकांनी (१.९ टक्के) घसरून ७९,७०७.७९ वर आणि निफ्टी ४७९.५५ अंकांनी (१.९ टक्के) घसरून २४,६९९.१० अंकावर होता. यामध्ये सुमारे ५७५ शेअर्स वधारले, ३,३४२ शेअर्स घसरले आणि १३५ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. शुक्रवारी भारतीय शेअर बाजार आधीच घसरणीसह बंद झाला होता. सेन्सेक्स ९६१ अंकांनी, तर निफ्टी १.२५ टक्क्यांनी घसरला होता.

वाढत्या भू—राजकीय अनि्च्तिततेमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर शेअर बाजारातही घसरण झाली. ज्यामुळे महागाई, वित्तीय दबाव आणि जागतिक विकासाबद्दल पुन्हा चिंता निर्माण झाली आहे. तेल कंपन्यांशी संबंधित शेअर्स दबावाखाली कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने विमान वाहतूक, ऑटो, पेंट आणि इतर ऊर्जा—केंद्रित क्षेत्रांवर परिणाम झाला.