जगभरातील शेअर बाजारांसाठी आजचा दिवस काळा ठरत आहे. जपानचा निक्केई हा निर्देशांक 4.6 टक्क्यांनी कोसळला. ऑस्ट्रेलियाचे शेअर तीन टक्क्यांनी घसरले तर दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराने दोन टक्क्यांनी आपटी खाल्ली. गेल्या 100 दिवसांमधल्या सरासरीखाली या तिनही शेअर बाजारांनी पातळी गाठली आहे. भारतीय शेअर बाजारातही जोरदार पडझड झाली असून सेन्सेक्स व निफ्टी अनुक्रमे 1200 व 400 अंकांनी घसरले आहेत. सोमवारी म्हणजे काल अमेरिकी शेअर बाजारात झालेल्या धुळधाणीची छाया जगभरातल्या शेअर बाजारांवर पडलेली दिसून येत आहे. अमेरिकच्या डाऊ इंडस्ट्रियल या निर्देशांकाने 1600 अंकांची अभूतपूर्व घसरण अनुभवली. इतिहासामध्ये एकाच दिवशी झालेली ही सर्वाधिक पडझड आहे.

सरकारी कर्जरोख्यांमधून मिळणारे वाढीव उत्पन्न व महागाई वाढण्याची भीती या दोन कारणांमुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून काढता पाय घेतला. अमेरिकी शेअर बाजारातील स्टँडर्ड अँड पूर 4.1 टक्क्यांनी घसरला तर डाऊची घसरण 4.6 टक्क्यांची झाली. ऑगस्ट 2011 नंतरची ही सर्वाधिक मोठी घसरण ठरली आहे.

अमेरिकी कर्जरोख्यांच्या उत्पन्नामध्ये झालेली भरघोस वाढ या घसरणीला कारणीभूत ठरली आहे. अमेरिकी कर्मचाऱ्यांचे पगार अत्यंत वेगाने वाढत असून 2009 नंतरची ही सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळे महागाई वाढेल आणि व्याजदरही वाढतील असा अंदाज असून परिणामी शेअर बाजारातील गुंतवणूक आतबट्ट्याची ठरू शकते असा विचार करून बाजारात विक्रीचा जोर दिसला.

गेले अनेक महिने शेअर्स तसेच कमॉडिटीमध्ये जोखीम उचलणाऱ्यांनी अमाप धन केलं परंतु आता फासे पलटल्याचे दिसत आहे. पुढील काळात बरेच चढउतार बघायला मिळतील असा तज्ज्ञांचा होरा आहे. जर्मनी व अन्य यरोपीय शेअर बाजारातही पडझड बघायला मिळाली. जर्मनीचा डॅक्स हा निर्देशांक चार महिन्यांच्या नीचांकावर होता. भारतीय शेअर बाजारातही याचे परिणाम दिसून आले असून मंगळवारी बाजार सुरू होताच सेन्सेक्स 1200 अंकांनी तर निफ्टी 400 अंकांनी घसरला आहे.