US-Iran Conflict : अमेरिका आणि इस्रायल यांनी केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर इराणने देखील प्रत्युत्तर देत केलेल्या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेत संघर्ष पेटला आहे. या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुचिक (Aleksandar Vucic) यांनी एक गंभीर इशारा दिला आहे. मध्य पूर्वेतील तणाव वाढल्याने तेलाच्या किंमती प्रचंड वाढतील, तसेच इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर युरोपला त्याचा मोठा फटका बसेल असे वुचिक म्हणाले आहेत.
अमेरिका आणि इस्रायलकडून झालेल्या हल्ल्यांनंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. तसेच या अरुंद सागरी मार्गावरून कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर रिव्हॉल्युशनरी गार्ड फोर्सेस आणि नौदल हे त्या जहाजांना आग लावतील असे म्हटले आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या इराणच्या निर्णयाचे परिणाम काय होतील याबद्दल बोलताना सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, या परिस्थितीमुळे तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ होईल आणि ही दरवाढ सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांसाठी मारक ठरेल.
होर्मुझची सामुद्रधुनी बंद होणे ही युरोपच्या अर्थव्यवस्थेसाठी एक संकट ठरेल, असे सांगताना वुचिक म्हणाले, “तेलाच्या किमती आपल्या सर्वांचा बळी घेतील. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने युरोप नरकात जाईल.”
जगभरातील तेलाच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा जलमार्ग रोखल्याने फक्त ऊर्जा संकट ओढावणार नाही, तर तर जागतिक महागाई अनियंत्रित पातळीवर पोहोचेलअसेही त्यांनी नमूद केले. “म्हणूनच इराणचा एक खरा मित्र म्हणून चीनने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचा आग्रह धरणे महत्त्वाचे आहे, कारण तसे झाले नाही तर तेलाच्या किमती युरोपला उध्वस्त करतील.”
इराणच्या सरकारी टेलिव्हिजनवर इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअरचे कमांडरचे सल्लागार ब्रिगेडीयर जनरल इब्राहिम जब्बारी म्हणाले की, “होर्मुझची सामुद्रधुनी आता बंद करण्यात आली आहे. इथून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक जहाजावर आम्ही हल्ला करू आणि ते पेटवून देऊ.”
“या प्रदेशात येऊ नका. तेलाची किंमत ८२ डॉलर्सवर पोहोचली आहे, आणि जग नक्कीच ती २०० डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा करत आहे. आम्ही देखील तेलाच्या पाईपलाईन्सवरती हल्ला करू आणि प्रदेशातून एक थेंबही तेल बाहेर जाऊ दिला जाणार नाही, असे ब्रिगेडियर म्हणाले.
होर्मुझची सामुद्रधुनी इतकी का म्हत्त्वाची आहे?
होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतुक मार्ग आहे. हा जलमार्ग सौदी अरेबिया, इराण, इराक आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या प्रमुख आखाती तेल उत्पादक देशांना ओमानचे आखात आणि अरबी समुद्राशी जोडतो.
जागभरत दररोजच्या एकूण तेल वापरापैकी सुमारे २० टक्के तेलाची वाहतूक ही या अरुंद सागरी मार्गाने होते, ज्याची किमान रुंदी ही ३३ किमी (२१ मैल) आहे. त्यामुळे या मार्गावर कोणताही अडथळा निर्माण झाल्यास कच्च्या तेलाच्या किमतीत अचानक मोठी वाढ होऊ शकते.
जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी सर्वात महत्त्वाची आणि संवेदनशील मानला जाणारा हा जलमार्ग आहे. जगातील समुद्रातून वाहतूक होणाऱ्या एकूण तेलापैकी सुमारे एक-तृतीयांश तेल आणि लिक्वीफाइड नॅचरल गॅस (LNG)चा एक मोठा हिस्सा याची वाहतूक याच मार्गाने होते.
