IGI Airport : दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली आहे. एका अफगाण विमानाने टेकऑफच्या धावपट्टीवर लँडिंग केल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला आहे. त्यामुळे दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकच खळबळ उडाली आहे.
अफगाणिस्तानच्या काबूलमधून आलेलं एरियाना अफगाण विमान दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं. मात्र, या अफगाण विमानाने लँडिंग करताना चुकून फक्त टेक-ऑफसाठी नियुक्त करण्यात आलेल्या धावपट्टीवर लँडिंग केलं. पण सुदैवाने यावेळी धावपट्टीवर दुसरं कोणतंही विमान उड्डाणासाठी सज्ज नव्हतं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भातील वृत्त टाईम्स नाऊने दिलं आहे.
समोर आलेल्या वृत्तानुसार, काबूलवरून येणाऱ्या फ्लाइट FG ३११ रविवारी दुपारी १२:०७ वाजता धावपट्टी २९ आर वर उतरलं. तेव्हा सुदैवाने लँडिंगच्या वेळी त्या धावपट्टीवर उड्डाण करण्यासाठी दुसरं कोणतंही विमान रांगेत सज्ज नव्हतं. त्यामुळे एक मोठा विमान अपघात टळला. मात्र, ही चूक नेमकं कशी घडली? यामध्ये हवाई वाहतूक समन्वयामध्ये काही संभाव्य त्रुटी आहेत का? याची चौकशी विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे.
दरम्यान, हे अफगाण विमान चुकून धावपट्टीवर उतरलं की दिल्ली एअर ट्रॅफिक कंट्रोलरच्या (एटीसी) सूचनेनुसार ते उतरवण्यात आलं, हे तपासण्यासाठी विमान वाहतूक अधिकारी चौकशी करत आहेत. पण या घटनेची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, या विमानाच्या पायलटने म्हटलं आहे की, कमी दृश्यमानता आणि आयएलएस मार्गदर्शन बिघाडामुळे विमान योग्य मार्गापासून दूर गेलं आणि या काळात दिल्ली टॉवरने कोणतीही नोंद केली नाही. तसेच आयएलएस सिस्टीममध्ये बिघाड झाल्याचा आरोप वैमानिकाने केल्याचं सांगितलं जात आहे.
