हरियाणाच्या पंचकुला परिसरात एका मोकळ्या जागेवर कारमध्ये सहा जणांचे मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. सोमवारी रात्री उशीरा हा प्रकार उघड झाला. याच कुटुंबातील सातवी व्यक्ती म्हणजे प्रवीण मित्तल यांना आसपासच्या नागरिकांनी शुद्धीत असताना कारबाहेर काढलं, पण रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून कारमध्ये त्यांना दोन पानांची सुसाईड नोट सापडली आहे. यात या संपूर्ण प्रकरणाचं मूळ नमूद करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

नेमकं काय घडलं पंचकुलामध्ये?

सोमवारी रात्री उशीरा पंचकुलामध्ये एका कारमध्ये संपूर्ण मित्तल कुटुंब मृतावस्थेत आढळून आलं. त्यात स्वत: ४४ वर्षीय प्रवीण मित्तल, त्यांची पत्नी रीना, आई विमला, वडील देशराज, त्यांच्या ११ वर्षीय जुळ्या मुली ध्रुविका आणि दलिशा तर १४ वर्षांचा मुलगा हार्दिक यांचा समावेश होता. सेक्टर २७ मध्येच राहणाऱ्या हर्ष नावाच्या स्थानिकाने सर्वप्रथम ही कार आणि त्यातील सगळा प्रकार पाहिला.

रात्री घराबाहेर पायी निघाला असता हर्षला या कारमध्ये काहीजण असल्याचं दिसून आलं. “कारच्या मागच्या बाजूची काच एका टॉवेलने आतून झाकण्यात आली होती. त्यांच्यात एक व्यक्ती शुद्धीत दिसत होती. मी त्याला बाहेर काढलं. कारमध्ये बसलेल्या व्यक्तींनी एकमेकांच्या अंगावर उलटी केल्याचं दिसत होतं. ज्या व्यक्तीला मी बाहेर काढलं, त्यानं त्याचं नाव प्रवीण मित्तल सांगितलं. त्यानं सांगितलं की तो आणि त्याचे कुटुंबीय बागेश्वर धाम येथे धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला गेले होते”, अशी माहिती हर्षनं पोलिसांना दिली.

प्रवीण यांनी विष प्यायल्याचं सांगितलं!

दरम्यान, प्रवीण यांनी विष प्यायल्याच सांगितलं, असं हर्ष म्हणाला. “प्रवीण मित्तल हे अर्धवट शुद्धीत होते. त्यामुळे त्यांच्या सांगण्यावर मला संशय आला. ते अडखळत होते. मी त्यांना थोडं पाणी पाजलं. त्यांनी मला सांगितलं की त्यांनी विष प्यायलं आहे. कारमधल्या सर्व कुटुंबीयांनीही विष प्यायल्याचं ते म्हणाले. मी लगेच पोलिसांना फोन केला. त्यानंतर पोलीस तिथे आले आणि त्यांनी प्रवीण मित्तल यांना रुग्णालयात नेलं. त्यानंतर कारमधल्या सगळ्यांनाही नेलं”, असं हर्ष म्हणाला.

या सर्वांना रुग्णालयाल मृत घोषित करण्यात आलं. पोलिसांना या कारमधून एक सुसाईड नोट सापडल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. “मी कर्जबाजारी झालो आहे. या सगळ्यासाठी मीच जबाबदार आहे. माझ्या सासऱ्यांना त्रास दिला जाऊ नये. आमच्यावर अंत्यसंस्कार माझ्या चुलत भावाला करू दिले जावेत”, असं या नोटमध्ये प्रवीण मित्तल यांनी लिहिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नेमकं काय घडलं प्रवीण मित्तल यांच्या आयुष्यात?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण मित्तल व त्यांच्या कुटुंबीयांनी आर्थिक संकट व मानसिक अस्थिरता यामुळे सामुहिक आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. त्यांच्या कुटुंबीयांची व इतर आप्तस्वकीयांची चौकशी करून इतर माहिती पोलीस गोळा करत आहेत.

प्रवीण मित्तल यांच्या सासऱ्यांनी त्यांच्या कुटुंबाबत सविस्तर माहिती पोलिसांना दिली आहे. प्रवीण यांचे सासरे राकेश गुप्ता यांनी सांगितलं की गेल्या १० वर्षांपासून त्यांचे प्रवीण मित्तल यांच्याशी फारसे संबंध नव्हते. प्रवीण मित्तल यांनी बँकेकडून जवळपास १ कोटींचं कर्ज घेतलं होतं, पण ते त्यांना फेडता आलं नव्हतं. गेल्या काही महिन्यांपासून प्रवीण त्यांच्या कुटुंबीयांसमवेत मनसा देवी कॉम्प्लेक्समध्ये एका भाड्याच्या घरात राहात होते. स्वत: राकेश गुप्तांनी त्यांची मुलगी रीना हिला आर्थिक मदत देखील केली होती.

प्रवीण मित्तल यांची पत्नी रीना यांची बहीण राखी गुप्ता व प्रवीण यांचे चुलत भाऊ संदीप अगरवाल यांनीदेखील कर्जासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. प्रवीण मित्तल यांना बँकेकडून दिवाळखोर घोषित करण्यात आलं होतं. जवळपास १२ वर्षांपूर्वी प्रवीण मित्तल हे पंचकुलामध्ये राहायला आले होते. आधी त्यांचा भंगारच्या सामानावर प्रक्रिया करण्याचा व्यवसाय होता. गेल्या पाच वर्षांपासून त्यांचा त्यांच्या नातेवाईकांशी फारसा संबंध नव्हता. ते डेहराडूनला राहायला गेले होते. तिथे त्यांनी ट्रॅव्हल एजन्सी सुरू केली होती. त्यात त्यांना मोठं आर्थिक नुकसान झालं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत असून प्रवीण मित्तल यांचे नातेवाईक व मित्रांची चौकशी केली जात आहे.