डेहराडून : उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यामध्ये एक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात सात जण ठार झाले आणि अन्य १२ जखमी झाले अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. ही बस अल्मोडा जिल्ह्यातील द्वारहाट येथून नेनिताल जिल्ह्यातील रामनगर येथे जात असताना भिकियासैन येथे हा अपघात झाला, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक देवेंद्र पिंचा यांनी सांगितले. पिंचा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बसमध्ये १८ ते १९ प्रवासी होते. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस कोसळल्याची माहिती त्यांनी दिली.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी बचाव व मदतकार्य सुरू केले. सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एकाने रुग्णालयात नेले जात असताना अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले.
