पीटीआय, बंगळूरु : कर्नाटकच्या गदग जिल्ह्यात हिजाब घातलेल्या मुलींना कथितरीत्या दहावीच्या परीक्षेला बसू दिल्याबद्दल सात शिक्षकांना निलंबित करण्यात आले असल्याचे शिक्षण खात्यातील सूत्रांनी सांगितले. हे शिक्षक सी.एस. पाटील शाळेत परीक्षा पर्यवेक्षक होते.  याच शाळेत केंद्र अधीक्षक असलेल्या आणखी दोन शिक्षकांनाही निलंबनाची नोटीस देण्यात आली आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

 शांतता, सौहार्द व सुव्यवस्था यांना बाधा पोहचवणारा हिजाब किंवा कुठलाही धार्मिक पोशाख घालण्यावर कर्नाटक सरकारने एका आदेशान्वये बंदी घातल्यानंतर, उडुपीतील सरकारी कनिष्ठ महिला महाविद्यालयाच्या काही मुस्लीम विद्यार्थिनींनी या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले होते. कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिका फेटाळून लावल्या होत्या. वरील शिक्षकांची कृती न्यायालयीन आदेशाच्या विरोधात असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. हिजाब ही आवश्यक धार्मिक प्रथा नसल्याचे सांगून, विद्यार्थ्यांना शाळेच्या गणवेषविषयक निकषांचे पालन करावे लागेल, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता.