पराभवाची चाहूल लागताच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडेन, डेमोक्रॅटसवर हल्लाबोल केला. डेमोक्रॅटसवर निवडणूक प्रक्रियेत घोटाळा केल्याचा आरोप केला. निकाल जाहीर होण्याआधीच स्वत:च्या विजयाची घोषणा केली. दरम्यान गुरुवारीही डोनाल्ड ट्रम्प यांचे असे आरोप सुरु राहिल्याने, अमेरिकेत अनेक वृत्तवाहिन्यांनी मध्येच त्यांच्या भाषणाचे प्रसारण थांबवले.

ट्रम्प चुकीची माहिती पसरवत असल्याबद्दल वृत्तवाहिन्यांनी यांच्या भाषणाचे प्रसारण रोखले. निवडणुकीच्या रात्रीनंतर डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदाच सर्वांसमोर आले. गुरुवारी व्हाइट हाऊसमधल्या १७ मिनिटाच्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी अनेक प्रक्षोभक आणि चुकीचे दावे केले.

आणखी वाचा- डोनाल्ड ट्रम्प यांना झटका, जॉर्जिया, मिशिगनमध्ये हरले कायदेशीर लढाई

डेमोक्रॅटस बेकायद मतांच्या आधारे आमच्या हातातून विजय चोरण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केला. ट्रम्प यांचे हे दावे आणि ते चुकीची माहिती पसरवत असल्याबद्दल एनबीसी आणि एबीसी वृत्तवाहिन्यांनी तात्काळ लाईव्ह कव्हरेज थांबवले असे वृत्त एएफपीने दिले आहे. “अमेरिकेसाठी ही वाईट रात्र आहे. त्यांचे राष्ट्राध्यक्षच लोकांवर निवडणुकीत विजय चोरण्याचा प्रयत्न होतोय असा चुकीचा आरोप करतायत” असे सीएनएनच्या अँकरने म्हटले. कुठलाही पुरावा नसताना खोटे आरोप केले जातायत असे सीएनएनच्या अँकरने म्हटले.

आणखी वाचा- US Election 2020 : न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर यापूर्वी दोन वेळा बदललाय निवडणुकीचा निकाल

जॉर्जिया, मिशिगनमध्ये ट्रम्प कायदेशीर लढाई हरले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना झटका बसला आहे. जॉर्जिया आणि मिशिगन या दोन्ही राज्यातील कायदेशीर लढाईत त्यांचा पराभव झाला आहे. आता ट्रम्प यांनी नेवाडा येथील मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप करत कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

नेवाडामध्ये सहा इलेक्टोरल व्होटस आहेत, सध्या बायडेन यांच्याकडे २६४ इलेक्टोरल व्होटस आहे. विजयासाठी त्यांना फक्त सहा मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे नेवाडामधली सहा इलेक्टोरल व्होटस त्यांच्या विजयामध्ये निर्णायक ठरु शकतात.