शिलाँगमधील चर्चच्या दोन प्रिस्टवर खासी समाजातील महिलेने लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे. अल्पवयीन असताना दोन ख्रिश्चन प्रिस्टनी आपल्या बरोबर लैंगिक गैरवर्तन केले होते असा आरोप मेरी थेरेसा कुरकालांग या महिलेने केला आहे. आरोप करणारी महिला आता ४४ वर्षांची असून तिने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून हे आरोप केले आहेत.

कॅथोलिक ग्रुपने या आरोपांची अंतर्गत चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. जेव्हा मी पाच वर्षांची होते तेव्हा एका प्रिस्टने मला गुप्तांग दाखवून त्याला स्पर्श करायला सांगितला. जेव्हा मी याबद्दल माझ्या कुटुंबियांना सांगितले तेव्हा त्यांनी माझ्या कानशिलात लगावून यापुढे अशा कथा बनवू नकोस असा दम दिला असे या महिलेने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यानंतर माझा छळ सुरुच होता.

वयात आल्यानंतर मला गर्भवती होण्याची भिती होती. त्यामुळे मी त्या प्रिस्टला भेटायचे किंवा त्याच्याशी बोलायचे टाळले. सध्या तो प्रिस्ट पश्चिम बंगालमध्ये आहे असे या महिलेने म्हटले आहे. दुसरा प्रिस्ट मला आणि अन्य मुलांना त्याच्या टेबल ड्रॉवरमधून चॉकेलट घ्यायला सांगायचा. ज्यावेळी आम्ही चॉकलेट घ्यायला जायचो त्यावेळी तो शरीरावरुन हात फिरवायचा असा आरोप तिने केला आहे.

लहान असताना मी या दुसऱ्या प्रिस्टबद्दल कोणाशीही काहीही बोलले नाही. कारण पहिल्या प्रिस्टकडून माझे मोठया प्रमाणावर शोषण झाले होते. ही घटना १९८० च्या दशकातील आहे. जेव्हा इंडियन एक्सप्रेसने कुरकालांगशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी आपल्याला जे काही म्हणायचे होते ते फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामध्ये आपल्याला आणखी काही नवीन जोडायचे नाही असे सांगितले.