सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलनं सुरू असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. सर्व विरोधी पक्ष देशातील लोकांची दिशाभूल करत आहे. कुणाचही नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही. तशी कायद्यात तरतूदच केलेली नाही,” असं ते म्हणाले.

सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करत दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी रविवारी आंदोलन केलं होतं. या आंदोलनावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर आंदोलनाने हिंसक वळण घेतले. जाळपोळीच्या घटनेनंतर पोलिसांनी विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात सोमवारी देशभरातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये निषेध करण्यात आला.

या कायद्याविरोधात विद्यार्थी निदर्शनं करत असून, विद्यार्थी नेता कन्हैया कुमारनंही यावरून सरकारवर टीका केली आहे. “तुम्ही आम्हाला नागरिक मानत नसाल, तर आम्ही तुम्हाला सरकार समजणार नाही. तुमच्याकडे संसदेमध्ये बहुमत आहे. पण, आमच्याकडे रस्त्यावरचे बहुमत आहे. ही लढाई हिंदू किंवा मुस्लिमांविषयी नाही. आम्हाला सावरकरांचा देश नकोय आम्हाला भगतसिंह आणि बाबासाहेब आंबेडकरांचा देश हवा आहे. त्यांची इच्छा आहे की अश्फाक आणि बिस्मिल यांनी भांडत राहावं पण, आम्ही तस घडू देणार नाही,” असं कन्हैया म्हणाला.

विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाष्य केलं. शाह म्हणाले, “सर्व विरोधी पक्ष देशातील लोकांची दिशाभूल करत आहेत. मी पुन्हा सांगतो की, कोणत्याही समाजातील कोणत्याही नागरिकाचे नागरिकत्व काढून घेण्याचा प्रश्नच येत नाही. तशी तरतूदच कायद्यात करण्यात आलेली नाही,” असं शाह म्हणाले.

“काँग्रेस पक्ष नेहरू लियाकत कराराचा भाग होता. पण, व्होट बँकेच्या राजकारणामुळे त्यांनी गेली सत्तर वर्ष त्यांनी याची अंमलबजावणी केली नाही. आमच्या सरकारने तो करार लागू करून लाखो, करोडो लोकांना नागरिकत्व दिलं आहे,” असंही शाह यांनी सांगितलं.