दिल्लीच्या शाहबाद डेअरी भागात १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची चाकूने भोसकून आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल (२९ मे) उजेडात आली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असून याप्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. हे प्रकरण उजेडात येताच पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, पोलीस आरोपी साहिल खान आणि अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची चौकशी करत आहेत. या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
साहिल आणि १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी यांच्यात प्रेमसंबंधात होते. परंतु, मुलीला हे नातं संपवायचं होतं. त्यामुळे साहिल नाराज झाला होता. मुलगी साहिलचे फोन उचलत नव्हती. त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. या सर्व प्रकाराचा साहिलला राग आला. त्याने तिला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. संबंध सुरू ठेवण्यासाठी साहिलने तिच्यावर दबाव आणला होता. परंतु तरीही तिने ऐकले नाही, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली असल्याचे वृत्त इंडिनय एक्स्प्रेसने प्रसिद्ध केले आहे.
मारामारी आणि खुनाच्या घटनाक्रमाचा शोध घेण्यासाठी पोलीस साहिल आणि अल्पवयीन कुटुंबाची चौकशी करत आहेत. तरुणी गेल्या काही आठवड्यांपासून मैत्रीणीच्या घरी राहत होती. हे प्रकरण उजेडात येताच आरोपी साहिलला सोमवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून अटक करण्यात आली. त्याला आज दिल्लीतील रोहिणी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
हेही वाचा >> “तिच्या डोक्याचे चार तुकडे झाले होते आणि… ” दिल्लीत हत्या झालेल्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी सांगितली आपबिती
नेमकं प्रकरण काय?
दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात एका गजबजलेल्या रस्त्यावर रविवारी साहिलने मुलीची हत्या केली. साहिल मुलीला मारत होता तेव्हा रस्त्यावर वर्दळ होती. परंतु, एकाही व्यक्तीने त्याला हटकले नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या एकाही पादचाऱ्याने मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला नसल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट दिसत आहे. हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
साहिलने ज्या शस्त्राने हत्या केली ती शस्त्रे अद्यापही जप्त करण्यात आली नाहीत. आरोपीने रात्री ८.४५ – ९ वाजण्याच्या दरम्यान मुलीची हत्या केली. त्यानंतर रिठाळा येथे जाऊन त्याने शस्त्रे फेकली. हत्या केल्यानंतर तो बसमधून बुलंदशहरला त्याच्या मावशीकडे गेला.
रस्त्यावर मृतदेह पडलेला असतानाही एकाही स्थानिकाने पोलिसांना कळवले नाही. पोलिसांना त्यांच्या एका सूत्राने या हत्येची माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला, असेही या वृत्तात म्हटले आहे.
पीडितेच्या प्राथमिक वैद्यकीय तपासणीत तिच्या शरीरावर ३४ हून अधिक जखमा असल्याचे समोर आले आहे. यापैकी २० जखमा खोलवर वार केल्यामुळे झाल्या आहेत. तसंच, तिच्या डोक्यावर वार केल्याने तिची कवटीही फुटली होती, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.