मध्य प्रदेशातील उज्जैनमधल्या अब्दालपुरा भागात शाही मशिदीचा भाग पाडण्याच्या कारवाईवरून वाद निर्माण झाला आहे. या ठिकाणी जेव्हा बुलडोझर आला तेव्हा मुस्लिम समुदायातच यावरून वाद निर्माण झाला आहे. एका गटाने मशिदीचा भाग पाडण्यास सहमती दर्शवली आहे. मात्र दुसऱ्या गटाने या कारवाईचा निषेध नोंदवत आंदोलन सुरू केलं आहे. एवढंच नाही तर जे पोलीस या ठिकाणी आले त्यांच्यावर दगडफेकही केली. ज्यानंतर पोलिसांनी वातावरण नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. या घटनेनंतर उज्जैनच्या अब्दालपुरा भागात तणाव निर्माण झाला आहे.

वादाचं कारण नेमकं काय आहे?

उज्जैनमध्ये २०२८ ला महाकुंभमेळा होणार आहे. यासाठी जी तयारी चालली आहे त्या अनुषंगाने शहरात विकासकामं होत आहेत. शहरातल्या काही इमारती तोडण्यात आल्या आहेत. या कारवाईत मोहन यादव यांचं वडिलोपार्जित घरही आहे. मोहन यादव यांच्या आजोबांनी बांधलेल्या घराचा एक भागही पाडण्यात आला आहे. याच विकास कामांच्या अनुषंगाने मशिदीचा एक भाग पाडण्यात येणार होता. मात्र रविवारी रात्रीपासूनच बुलडोझर कारवाईला विरोध दर्शवत या ठिकाणी लोकांचा जमाव जमू लागला. सोमवारी सकाळी प्रशासनाचे लोक तोडक कारवाईसाठी आले तेव्हा वाद वाढला आणि या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. ज्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या.ANI ने या घटनेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

मशिद समितीचं म्हणणं काय आहे?

मशिदी समिती आणि स्थानिकांचं हे म्हणणं आहे की रस्ता रुंदीकरणासाठी दुसरा रस्ता निवडला जावा किंवा समोरच्या इमारती हटवून रस्ता रूंद करण्यात यावा. जी मशिद पाडण्याची कारवाई करण्यात येणार होती ती मशिद ही वक्फ बोर्डात नोंदणी झालेली आहे आणि धार्मिक स्थळ आहे ही बाब प्रशासनाने लक्षात घेतली पाहिजे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने ९ सप्टेंबरला कारवाईला विरोध दर्शवणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या होत्या. ज्यानंतर मशिद समितीने डिव्हिजन बेंचकडे याचिका दाखल केली आहे. ज्यावर सुनावणी सुरू आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी मशिदीच्या पाडकामावरून तणाव निर्माण झाला आहे.

दरम्यान मशिदीच्या ५०० मीटरच्या भागात चारही बाजूंनी सुमारे २ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बॅरिकेडिंगही करण्यात आलं आहे. ज्या लोकांनी तोडक कारवाईच्या विरोधात आंदोलन केलं त्यामध्ये महिलांचाही समावेश होता. पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलकांना समजावलं. रविवारी रात्रीपासून जो तणाव निर्माण झाला होता तो काहीसा कायम आहे. त्यामुळे पोलीस या ठिकाणी काही अनुचित प्रकार पुन्हा घडणार नाही ना? याकडे लक्ष ठेवून आहेत.