Shahzad Bhatti operates a dangerous Pakistan Terrorist Network : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शनिवारी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि गुजरात येथून नऊ जणांना अटक केली. या नऊ जणांच्या नेटवर्कशी संबंधित असलेला पाकिस्तानी सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर शाहजाद भट्टी भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे. भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य करणाऱ्या शाहजाद भट्टीने सोशल मीडियावरील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, व्यावसायिक आणि स्वतःला धर्माचा रक्षक म्हणवून घेत आपली एक विशिष्ट प्रतिमा निर्माण केली. 333 बॅनरखालील व्हिडिओंच्या माध्यमातून या पाकिस्तानी इन्फ्ल्युएन्सरने धार्मिक वाद, इतर इन्फ्ल्युएन्सर्समधील वाद आणि भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य करत एक मोठा चाहतावर्ग निर्माण केला. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.

सध्या भट्टी भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या विविध तपासांच्या केंद्रस्थानी आला असून आपण कोणतेही गँगस्टर किंवा माफिया बॉस नसल्याचा दावा त्याने केलाय. परंतु, त्याचा एका मोठ्या सीमापार गुन्हेगारी आणि दहशतवादी नेटवर्कमध्ये मुख्य सूत्रधार म्हणून उदय झाला असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे.

भारतात नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न

या नऊन जणांना अटक करण्यात आल्याने भट्टी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. स्वतःला व्यावसायिक, सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आणि राष्ट्रवादी आवाज म्हणून सादर करणारा भट्टी, आपण इस्लाम आणि पाकिस्तानच्या वतीने बोलत असल्याचा दावा करतो. ‘जट’ या टोपणनावानेही ओळखला जाणारा हा भट्टी मूळचा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहिवासी आहे. तो पहिल्यांदा २०१३ मध्ये पाकिस्तान पोलिसांच्या रडारवर आला होता. तेव्हा त्याच्यावर चोरी आणि दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतरच्या काही वर्षांत त्याच्यावर बलात्काराच्या आरोपांसह अनेक गुन्हे दाखल झाले. मात्र, हे आरोप त्याने फेटाळून लावले. त्याचे नाव लाहोरच्या गुन्हेगारी जगताशी, विशेषतः फारुख खोखरसारख्या कुप्रसिद्ध व्यक्तींशी जोडले गेले आहे. भट्टीने सार्वजनिकरित्या हे संबंध संघटनात्मक नसून केवळ वैयक्तिक मैत्री असल्याचे सांगितले आहे.

अंदाजे २०१५ च्या सुमारास भट्टी यूएई (UAE) मध्ये स्थलांतरित झाला होता. तिथे तो शेती आणि दुग्ध व्यवसायासोबतच स्क्रॅप ट्रेडिंगचा (भंगार मालाचा) व्यवसाय करत असल्याचे म्हटले जाते. तो सध्या कुठे वास्तव्यास आहे याबाबत माहिती मिळाली नसली तरीही तरी तो पाकिस्तान आणि आखाती देशांदरम्यान ये-जा करत असल्याचे तपासकर्त्यांचे मत आहे. २०१८ नंतर पाकिस्तानमध्ये टिकटॉकच्या (TikTok) झपाट्याने झालेल्या विस्ताराचा फायदा घेणाऱ्या सोशल मीडिया स्टार्समध्ये भट्टी आघाडीवर होता. त्याने धर्म, राष्ट्रवाद आणि ऑनलाइन समीक्षकांवरील वादग्रस्त व्हिडिओंद्वारे आपला मोठा चाहतावर्ग तयार केला. सोशल मीडियावर तो त्याच्या ‘333’ या ब्रँडिंगमुळे ओळखला जातो. ही कोणती गँग किंवा संघटित गट नसून केवळ आपली वैयक्तिक ओळख असल्याचे तो म्हणतो.

भट्टीने स्वतःला धार्मिक मुद्यांचा रक्षक म्हणून सादर केले असून, तो पाकिस्तानी इन्फ्ल्युएन्सर्सशी संबंधित ईशनिंदा वादांवर वारंवार भाष्य करत असे. एप्रिल २०२५ मध्ये इन्फ्ल्युएन्सर रजब बट याच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरही त्याने भाष्य केले होते.

लॉरेन्स बिश्नोईशी कथित संबंध

भट्टीच्या सार्वजनिक आयुष्यातील सर्वात रंजक आणि धक्कादायक पैलू म्हणजे, सध्या तुरुंगात असलेला भारतीय गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्याशी त्याने दावा केलेली मैत्री होय. तसंच, झीशान अख्तर याच्याबरोबरही त्याची चांगली मैत्री असल्याचे तपासकर्त्यांचे म्हणणे आहे. झीशान अख्तर हा बिश्नोईचा कथित सहकारी असून ऑक्टोबर २०२४ मध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा त्याच्यावर आरोप आहे. गेल्या वर्षी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बिश्नोईने केलेल्या पाकिस्तानविरोधी विधानांमुळे हे संबंध ताणले गेले असल्याचे दिसून येते.

भट्टीच्या वाढत्या सोशल मीडियावरील प्रभावाने भारतीय सुरक्षा यंत्रणांचे लक्ष वेधून घेतले होतेच, पण मार्च २०२४ मध्ये पंजाबमधील जालंधर येथे झालेल्या ग्रेनेड हल्ल्यामुळे तो थेट रडारवर आला. जालंधरमधील इन्फ्ल्युएन्सर रोझर संधू याच्या निवासस्थानाजवळ झालेला हा हल्ला कथितपणे भट्टीनेच घडवून आणला होता.

भारतात कसे पसरले जाळे?

गेल्या काही महिन्यांत, भारतीय यंत्रणांनी गंभीर आरोप केला आहे की भट्टीचा थेट संबंध पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’ (ISI) शी आहे. तो भारतातील बेरोजगार तरुणांचे कट्टरताकीकरण करून आपले जाळे विस्तारण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये भट्टीविरुद्ध डझनभराहून अधिक एफआयआर (FIRs) नोंदवले गेले असून, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) देखील काही गुन्हे दाखल केले आहेत. यातील अनेक गुन्ह्यांमध्ये भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांशी संबंधित गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने केलेल्या ताज्या अटक सत्राव्यतिरिक्त, भट्टीचा संबंध एप्रिलमध्ये मध्य प्रदेशातून अटक करण्यात आलेल्या दोन तरुणांशीही जोडला गेला आहे.

महाराष्ट्र एटीएस (ATS) चा तपास

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांमध्ये महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचाही (ATS) समावेश आहे. १३ मे रोजी, महाराष्ट्र एटीएसने राज्यभरात जवळपास ४० ठिकाणी छापे टाकले आणि भट्टीच्या नेटवर्कशी जोडलेल्या सोशल मीडिया अकाऊंट्सद्वारे ऑनलाइन संपर्क ठेवणाऱ्या ५३ संशयितांची सखोल चौकशी केली. या कारवाईत कोणतीही आक्षेपार्ह सामग्री जप्त करण्यात आली नसली आणि कोणताही नवीन एफआयआर नोंदवला गेला नसला, तरी या कारवाईमुळे या नेटवर्कच्या ऑनलाइन कट्टरताकीकरण मॉडेलची महत्त्वाची माहिती मिळाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

एटीएस अधिकाऱ्यांच्या मते, हे नेटवर्क सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून प्रशासनाविरोधात असंतोष किंवा संताप व्यक्त करणाऱ्या तरुणांना जाळ्यात ओढते. एटीएसच्या सूत्राने सांगितले, “अशा तरुणांना त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले जाते आणि विविध प्रलोभने दिली जातात. ही भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होते, याद्वारे संभाव्य उमेदवारांच्या मानसिकतेची चाचणी घेतली जाते. सुरुवातीला त्यांना लहान आणि साधी कामे दिली जातात. एकदा का ती व्यक्ती पूर्णपणे प्रेरित झाल्याचे लक्षात आले, की त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर समस्या निर्माण करण्यासाठी एका गुप्त ग्रुपमध्ये समाविष्ट केले जाते.”

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रातील या मोहिमेचा मुख्य उद्देश हे जाळे मोठ्या सुरक्षा धोक्यात बदलण्यापूर्वीच अशा ऑनलाईन संपर्कांचे स्वरूप समजून घेणे आणि त्यावर वेळेत वेसण घालणे हा होता. “अशा असंतुष्ट तरुणांना देशविरोधी कृत्यांच्या जाळ्यात ओढले जाऊ नये म्हणून आम्ही संशयास्पद सोशल मीडिया अकाऊंट्सवर बारीक लक्ष ठेवून आहोत. याच संदर्भात आम्ही राज्यभरात छापे टाकले आणि भट्टीशी संबंधित सोशल मीडिया अकाऊंट्सच्या संपर्कात असलेल्या संशयितांची चौकशी केली”, असे अधिकाऱ्याने पुढे सांगितले.