Shakib Al Hasan House Bomb Attack: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी बुधवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेत बांगलादेश क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बांगलादेश आवामी लीगचे माजी खासदार शकीब अल हसन यांनी देखील व्हर्च्युअली पद्धतीने हजेरी लावली. दरम्यान, या पत्रकार परिषदेनंतर शकीब यांच्या जुन्या घरावर रात्रीच्या सुमारास पेट्रोल बॉम्ब
फेकल्याची घटना उघडकीस आली आहे.

शकीब अल हसन यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला

याबाबत स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, स्थानिक वेळेनुसार रात्री ८.४५ वाजता शकीब अल हसन यांच्या केशांबोर येथील येथील जुन्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. मगुरा शहरात शकीब यांचे वडिलोपार्जित घर आहे. शकीब अल हसन आवामी लीग या पक्षाचे माजी खासदार आहेत. पक्षाच्या अध्यक्षा आणि बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी बुधवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका स्पष्ट केली. त्यांनी डिसेंबरमध्ये बांगलादेशमध्ये परतणार असल्याचेही स्पष्ट केले. तसेच, माघारी परत्यानंतर त्यांना तुरुंगात टाकले जाईल किंवा हत्या देखील केली जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

हसीना यांच्या पक्षाने दिली माहिती

शेख हसीना यांच्या आवामी लीगच्या वतीने या बॉम्ब हल्ल्याची माहिती एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन देण्यात आली आहे. “बांगलादेशचे प्रसिद्ध क्रिकेटपटू शकीब अल हसन यांच्या घरावर बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. शेख हसीना यांच्या पत्रकार परिषदेत सहभाग घेतल्यानंतर ही घटना घडली. पत्रकार परिषदेच्या पूर्वी बीएनपी इस्लामिस्ट जमात आणि एनसीपीने माध्यमांना परिषदेचे वृत्त प्रसिद्ध न करण्याबाबत खुली धमकी दिली होती”, असे पक्षाने पोस्टमध्ये म्हटले आहे.

शकीब अल हसन यांची हसीनांच्या पत्रकार परिषदेत हजेरी

या हल्ल्याबाबत अद्याप स्थानिक प्रशासनाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दिल्लीत शेख हसीना यांनी व्हर्च्युअल पद्धतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर ही घटना घडली. “लोकशाहीच्या नावाखाली नागरिकांची सुरु असलेल्या कत्तलीचा हा पुरावाच आहे”, अशा शब्दात आवामी लीगने या हल्ल्यावर टीका केली आहे. दरम्यान, शेख हसीना यांनी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांना २०२४ मध्ये जबरदस्तीने देश सोडण्यास भाग पाडले असा आरोप केला, पण, त्यांची लोकांशी असलेली नाळ अद्याप तुटली नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना वडील आणि कुटुंबियांच्या आठवणीत हसीना भावुक झाल्या होत्या.

शेख हसीना काय म्हणाल्या?

“गेल्या दोन वर्षांपासून माझा देश कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे मी बघतेय, आपण उभा केलेला हा बांगलादेश नाही. १९७१ मध्ये ३० लाख लोकांनी बलिदान दिलेला हा बांगलादेश नाही. संघटीत घटकांनी विद्यार्थ्यांना हाताला धरुन त्यांच्या मागण्यांचा राजकीय फायद्यासाठी वापर केला. हा शांततापूर्ण विद्यार्थी मोर्चा नव्हता. माझ्या सरकारने संवादाच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण, संघटीत घटकांनी विद्यार्थ्यांचा राजकीय वापर केला”, असा आरोप शेख हसीना यांनी केला.