नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना सोमवारी विराम दिला. राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी विलीनीकरणावर पहिल्यांदाच थेट भाष्य केले.
विलीनीकरणाबाबत जयंत पाटील व अजित पवार हे दोन्ही नेते चर्चा करत होते. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर या चर्चा थांबल्या आहेत. विलीनीकरणासंदर्भात आतापर्यंत चर्चेच्या पाच ते सहा फेर्या झाल्या असून त्याची संपूर्ण माहिती या दोन्ही नेत्यांनी मला दिली होती. आता विलीनीकरणावर आमच्या पक्षात चर्चा झालेली नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. भविष्यात विलीनीकरण होईल का, या प्रश्नावर मात्र आज हे सांगणे अशक्य आहे. अजित पवार यांचा विलीनीकरणाबाबतचा दृष्टिकोन समाधानकारक होता, आता ते नसल्याने त्याबाबत चर्चा पुढे चालू राहिली नाही, असे पवार म्हणाले.
लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आले पाहिजे, असे सांगत पवार म्हणाले की, अजित पवार जनतेचे काम करण्यासाठी सक्रिय होते आणि त्यांचा आदर केला जात होता. पण दुर्दैवाने अपघातात त्यांचे निधन झाले. आज कुटुंबाचा प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. कुटुंबाचा प्रमुख भविष्यातील वाटचालीचा निर्णय घेतो, ही आमच्या कुटुंबाची परंपरा आहे. या नात्यानेच बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला, असेही पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाशी संपर्क केला होता. पण काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार उभा केला आहे. त्याबद्दल, राष्ट्रीय पक्षांनी उमेदवार उभे करण्यात काहीही चुकीचे नाही. हा पक्षाचा निर्णय असतो व त्यांचा तो हक्कही आहे. ह्य्बिनविरोधह्ण निवडणुकीची मागणी करणे चुकीचे आहे, लोकशाहीत निवडणूक लढवणे ही स्पर्धा असते. काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा न दिल्याबद्दल पार्थ पवार यांनी टीका केली. त्यावर, पक्ष नेतृत्वाकडे बोलण्याचा अधिकार असतो. राजकारणात वावरण्यासाठी परिपक्वतेची आवश्यकता असते, ती त्यांच्यात कितपत आहे, हे सांगू शकत नाहीत, अशी कोपरखळी शरद पवार यांनी मारली.
लवकरच राज्याचा दौरा
काँग्रेस व शिवसेनेच्या ठाकरे गटाने पाठिंबा दिल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शरद पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. त्यांनी सोमवारी राज्यसभेत जाऊन शपथही घेतली. न्यूमोनियामुळे महिनाभर रुग्णालयात राहिल्यामुळे शपथविधीला जाताना व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला, असे शरद पवार म्हणाले. लवकरच संपूर्ण राज्याचा दौरा करणार असल्याचेही पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यात भोंदू बाबा वाढले
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरही शरद पवारांनी भाष्य केले. आजकाल महाराष्ट्रात बनावट बाबांची संख्या वाढत आहे. एकीकडे शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांची चर्चा होते पण, दुसरीकडे लोकप्रतिनिधी अशा भोंदूबाबांना भेटतात. हे महाराष्ट्राच्या विचारधारेच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आले आहे. राजकारणात आणि समाजात उच्च पदांवर असलेले अनेक लोक या प्रकरणात गुंतलेले आहेत. ही परिस्थिती महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी अजिबात चांगली नाही, असे पवार म्हणाले. मी पंढरपूरला पांडुरंगाच्या व तुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनाला जातो. निवडणुकीवेळी कान्हेरी गावात मारुतीचेही दर्शन घेतो. पण त्याची जाहीर वाच्यता करत नाही, असे पवार म्हणाले.
