पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी व तृणमूल काँग्रेसमध्ये सध्या अत्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. भाजपा अध्यक्ष नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपा अधिकच आक्रमक झाली असून, टीमसीला सर्वोतोपरी कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व टीएमसी अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी देखील राजकीय हालचाली वेगवान केल्याचे दिसत आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी या संदर्भात चर्चा केली आहे. तर, “गरज पडल्यास शरद पवार हे स्वतः पश्चिम बंगालमध्ये जातील, तसेच विरोधकांना एकत्र करण्याचं काम करतील.” असं राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही सांगण्यात आलं आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, “याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाली आहे. निश्चित रुपाने हा विषय गंभीर असल्याने, देशातील अन्य नेत्यांबरोबर देखील शरद पवार यांची चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतही बैठक होऊ शकते. गरज पडल्यास शरद पवार हे स्वत: पश्चिम बंगालला जातील व विरोधकांना एकत्र करण्याचे काम करतील.”

तसेच, “पश्चिम बंगालमधील सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र भाजप रचत आहे. राज्य सरकारांच्या अधिकारांचे हनन करून राजकीय फायदा उठवण्याचे काम भाजपाकडून होत आहे. केंद्र सरकारचा वापर करून राजकीय फायद्या घेण्याचं काम भाजपाकडून बंगालमध्ये सुरू झालेलं आहे. निवडून आलेलं सरकार पाडणं हा योग्य कार्यक्रम नाही, लोकशाहीला धरून नाही.” अशी टीका देखील नवाब मलिक यांनी भाजपावर केली आहे.