नवी दिल्ली : Congress Savarkar Issue काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये झालेल्या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. ‘‘आपल्याला मोदींविरोधात लढायचे आहे की, सावरकरांविरोधात’’, असा थेट प्रश्न पवारांनी राहुल गांधींना केला. विरोधकांच्या एकीसाठी काँग्रेसनेही नरमाईचे संकेत दिले असून, सावरकरांचा मुद्दा बाजूला ठेवण्याची तयारी राहुल गांधींनी दाखवल्याचे समजते.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी सोमवारी रात्री बोलावलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधीही उपस्थित होते. ‘‘मी सावरकर नव्हे, गांधी आहे. मी माफी मागणार नाही’’, या राहुल गांधींच्या विधानाचे पडसाद या बैठकीतही उमटले. ‘‘सावरकरांचा संघाशी संबंध नव्हता, ते संघाचे सदस्य नव्हते. त्यामुळे भाजपविरोधातील विरोधकांच्या संघर्षांमध्ये सावरकरांचा मुद्दा आड येऊ नये’’, असे पवारांनी बैठकीत समजावून सांगितले. ‘‘सावरकर हा अस्मितेचा प्रश्न असून, त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही’’, अशी भूमिका ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारच्या सभेत घेतली होती. त्यामुळे विरोधकांच्या सोमवारच्या बैठकीकडे ठाकरे गटाच्या सदस्यांनी पाठ फिरवली होती.
काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यातील मतभेद तीव्र झाले तर त्याचा फटका राज्यातील महाविकास आघाडी सरकारलाही बसू शकतो याची जाणीव पवारांनी बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांना करून दिली. संसदेत, तसेच संसदेबाहेरही आपण (विरोधक) मोदींच्या भाजपविरोधात लढत आहोत. विरोधकांचे प्रमुख लक्ष्य भाजपचा पराभव करणे हेच असायला हवे. या उद्देशापासून विरोधकांनी दूर जाणे योग्य नाही, अशी भूमिका पवारांनी घेतली. सोनिया गांधींच्या समक्ष पवारांनी मध्यस्थीची भूमिका घेतल्यानंतर राहुल गांधी यांनीही सावरकरांच्या मुद्दय़ावर सबुरीचे संकेत दिले.
‘‘भाजपविरोधात लढण्याच्या व्यापक उद्देशाने विरोधक एकत्र आले आहेत. काँग्रेस आणि डाव्या पक्षांची राजकीय विचारसरणी वेगवेगळी आहे तरीही, आम्ही एकमेकांशी जुळवून घेत आहोत’’, असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे सावरकरांच्या मुद्दय़ावरून मित्रपक्षांशी मतभेद तीव्र होणार नाहीत, याची दक्षता काँग्रेसकडून घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाकरे गटाचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींशी फोनवरून संवाद साधला असून, ते खरगेंची भेट घेणार आहेत.
लंडनमध्ये राहुल गांधी यांनी देशविरोधी विधाने केल्याचा आरोप करीत भाजपने त्यांच्या माफीच्या मागणीसाठी संसदेमध्ये रान उठवले आहे. त्यावर, ‘‘मी सावरकर नाही, गांधी आहे’’, असे सांगत राहुल गांधींनी माफी मागण्यास नकार दिला. बडतर्फीच्या मुद्दय़ावर राहुल गांधींना पाठिंबा देणाऱ्या ठाकरे गटाने सावरकरांबाबतच्या विधानावरून काँग्रेसला रोखठोक इशारा दिला होता.
‘आम्ही एकत्रच’
संसदेतील काँग्रेसच्या सोमवारच्या मोर्चात ठाकरे गटाचे खासदार सहभागी झाले नव्हते. खरगेंच्या बैठकीकडेही त्यांनी पाठ फिरवल्याने महाविकास आघाडीच्या एकजुटीला तडा जात असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, सावरकरांबाबतच्या मुद्यावर खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्याशी मंगळवारी फोनवर चर्चा केली. राहुल हे उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही एकत्र आहोत, असेही राऊत म्हणाले. कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनीही शिवसेनेसह १९ पक्षांची भाजपविरोधात एकजूट असल्याचे स्पष्ट केले.