Sharad Pawar Meet Abhijit Dipke: नीट पेपरफुटी प्रकरणावरुन दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर आता विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. सगल दुसऱ्या दिवशी संसदेत या प्रकरणावरुन गदारोळ झाल्यानंतर आज राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाजवळ ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. दुसरीकडे शरद पवारांनी देखील जंतर मंतरवर दाखल होत कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंची भेट घेतली. पवारांनी लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या तब्येतीची दिपकेंकडून माहिती घेतली, यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.
जंतर मंतरवर अभिजीत दिपके आणि शरद पवारांची भेट
“शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, ज्या मुलांनी आत्महत्या केलीय त्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये नुकसान भरपाई मिळायला हवी, सोनम वांगचुक यांना अवैध पद्धतीने ताब्यात घेतले असून, त्यांची तत्काळ सुटका करण्यात यावी, देशभर मुलांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, दिल्ली पोलिसांची देखील चौकशी व्हायला हवी”, अशा मागण्या आंदोलकांच्या असल्याची माहिती अभिजीत दिपकेंनी शरद पवारांशी चर्चा करताना दिली.
शरद पवारांनी घेतली जखमी विद्यार्थ्यांची माहिती
“दिल्ली पोलिसांनी मुलींना मारहाण केली, पुरुष पोलिसांनी मारहाण केली, त्यांची कपडे फाडण्यात आली”, असा आरोप अभिजीत दिपकेंनी यावेळी माध्यमांशी बोलताना केला. “शरद पवारांनी जखमी विद्यार्थ्यांची माहिती घेतली”, असे दिपके म्हणाले. महाराष्ट्रातील विरोधक पहिल्यापासूनच आमच्याबरोबरच असल्याची माहितीही दिपकेंनी दिली. “शरद पवार, उद्धव ठाकरेंचा पहिल्यापासून पाठिंबा होता”, असेही दिपके माध्यमांशी बोलताना म्हणाले. पवारांनी यावेळी दिपकेंना काही मदत हवीय का? तसेच, किती दिवस थांबणार आहात? अशी विचारणा केली.
राहुल गांधींचे देखील ठिय्या आंदोलन
“शरद पवारांनी विचारणा केल्यानंतर आता ३१ दिवसांपासून इथं (जंतर मंतरवर) असल्याचे सांगितले. तसेच, सोमवारी घडलेल्या प्रकारानंतर लोकांमध्ये संताप वाढला आहे”, असे दिपके म्हणाले. दुसरीकडे राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्या काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाजवळ ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. “धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, विद्यार्थ्यांना न्याय द्या, मोदी सरकार शेम… शेम, हुकूमशाही नहीं चलेगी”, अशा घोषणा यावेळी काँग्रेस नेत्यांनी दिल्या. दरम्यान, सरकारकडून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह राहुल गांधींच्या भेटीला दाखल झाले आहेत.
