Sharad Pawar On India Pakistan Ceasefire : पहलगाम हल्ल्यानंतर सुरू झालेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष आज संपुष्टात आला. आज (१० मे) संध्याकाळी ५ वाजल्यापासून दोन्ही देशांमध्ये शस्त्रविरामाबाबत एकमत झाले आहे. त्यामुळे दोन्ही देशांकडून सीमेवर केले जाणारी कारवाई आता थांबली आहे. यादरम्यान आता यासंदर्भात राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
भारताचा कोणत्याही लष्करी तळांवर किंवा पाकिस्तानी नागरिकांवर हल्ला करण्याचा हेतू नव्हता असे शरद पवार म्हणाले आहेत. तसेच त्यांनी भारतीय लष्कराने केलेली कारवाई अनिवार्य होती असेही म्हटले आहे. “भारताने कधीच दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने केवळ दहशतवादी तळांवर प्रखर आणि अचूक कारवाई केली — कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवर वा सामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचा हेतू नव्हता. ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती,” असे शरद पवार म्हणाले आहेत.
“पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या कुरघोड्यांना संयमाने आणि निर्णायक उत्तर देणं ही भारताची जबाबदारी आहे आणि भारताने ती जागतिक शांततेच्या भानासह पार पाडली आहे. भारत हा नेहमीच शांततेचा आणि संवादाचा समर्थक राहिला आहे. आणि त्यादिशेने काही घडामोडी घडत असतील तर ते स्वागतार्ह आहे. मात्र दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलणं हेदेखील आंतरराष्ट्रीय समुदायाचं सामूहिक कर्तव्य आहे. शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल — हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं,” असेही शरद पवार त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
भारताने कधीच दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने केवळ दहशतवादी तळांवर प्रखर आणि अचूक कारवाई केली — कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवर वा सामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचा हेतू नव्हता. ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती.
पाकिस्तानकडून…This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 10, 2025
दरम्यान आज भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी माध्यमांसमोर येत भारत आणि पाकिस्तान यांच्या सैन्याच्या अधिकार्यांमध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी भारत व पाकिस्तान यांच्यात शस्त्रविरामासंदर्भात सहमती झाली असून आज (१० मे) संध्याकाळी पाच वाजल्यापासून ही शस्त्रसंधी दोन्ही बाजूंनी लागू झाल्याचे सांगितले. त्यामुळे सीमेवर दोन्ही बाजूंनी केली जाणारी जमिनी, हवाई आणि सागरी मार्गाने केली जाणारी कारवाई स्थगित झाली आहे. तसेच यासंदर्भात आता सोमवारी १२ मे रोजी दुपारी १२ वाजता भारत व पाकिस्तानचे DGMO अर्थात लष्करी कारवायांसदर्भातले महासंचालक पुढील चर्चा करणार आहेत.