Sharad Pawar PM Narendra Modi Meeting reason explained: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) नेते शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंची भेट घेऊन त्यांच्याकडून सोमवारी झालेल्या मोर्चाची माहिती घेतली होती. मोर्चामध्ये नेमके काय झाले? किती जणांना मारहाण झाली? अशी माहिती घेतल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना काही मदत करू शकतो का, असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर आज त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर विविध चर्चा उपस्थित केल्या जात होत्या. त्यावर खुद्द शरद पवार यांनी उत्तर दिले आहे.

दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण, राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार) पक्षाचा एनडीएला पाठिंबा अशा विविध बाबींवर गेल्या काही दिवसांत उलटसुलट चर्चा होत आहेत. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकालाही काही अटी-शर्तींवर आणि मसुदा तपासून पाठिंबा देण्याचा विचार करू, असे विधान सुप्रिया सुळे यांनी केले होते. त्यामुळे या भेटीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात होते.

अजित पवार यांच्या जन्मदिनीच भेट

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज जन्मदिन असून राज्य सरकारकडून हा दिवस जयंती म्हणून घोषित करण्यात आला आहे. अजित पवार गट एकीकडे राज्यात ठिकठिकाणी जयंतीचे कार्यक्रम घेत असताना दिल्लीत शरद पवार आणि सुप्रिया सुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पोहोचले होते. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून दोन्ही नेते त्यासाठी दिल्लीत आहेत.

Sharad Pawar Meet Abhijit Dipke
VIDEO: काही मदत हवी का, किती दिवस थांबणार आहात? शरद पवारांनी जंतर मंतरवर घेतली अभिजीत दिपकेंची भेट; काय चर्चा झाली?

भेटीबद्दल अभिजीत दिपके काय म्हणाले?

दरम्यान या भेटीनंतर अभिजीत दिपके यांना प्रश्न विचारला गेला. या भेटीत नेमके काय झाले असेल, असे त्यांना विचारण्यात आले. यावर दिपके म्हणाले, शरद पवार यांनी काल माझी भेट घेतली, तेव्हा माझ्या मागण्यांना त्यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच त्यांनी आमच्या आंदोलनाचे समर्थन केले आहे. त्यांनी संसदेत हा विषय उचलण्याचे आश्वासन दिले होते. मला वाटते, आज त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर हा विषय मांडला असेल.

शरद पवार यांनी काय म्हटले?

शरद पवार यांच्या एक्स हँडलवर त्यांनी या भेटीमागचा उद्देश आणि प्रत्यक्ष भेटीत कोणती चर्चा झाली, याची माहिती दिली. त्यांनी लिहिले, नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन, त्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेली अयोग्य वागणूक, विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे यासंदर्भात पंतप्रधान मोदींशी चर्चा केली.

तसेच देशातील आणि महाराष्ट्रातील शेती क्षेत्रातील प्रशासकीय व धोरणात्मक त्रुटी, शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या व विविध प्रलंबित मागण्या या गंभीर विषयांवर चर्चा केली, असेही शरद पवार यांनी लिहिले.

शरद पवार पुढे म्हणाले, “बैठकीदरम्यान मी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि पेपरफुटीच्या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याबाबत माझी सविस्तर भूमिका मांडली. यासोबतच शेती, शेतकऱ्यांच्या समस्या, पाणी व्यवस्थापन तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर माननीय पंतप्रधानांशी सविस्तर चर्चा केली. या सर्व प्रश्नांवर सकारात्मक आणि ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले.”