नवी दिल्ली : राज्यसभेतील १९ नवनियुक्त सदस्यांची सोमवारी शपथ घेतली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, केंद्रीयमंत्री व ‘आरपीआय’चे अध्यक्ष रामदास आठवले, भाजपचे रामराव वडकुते, माया इवनाते, शिवसेना शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे या पाच मराठी खासदारांनी शपथ घेतली.
राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी शरद पवार व्हीलचेअरवरून आले होते. शरद पवार व रामदास आठवले यांनी हिंदीमध्ये संविधानाच्या साक्षीने शपथ घेतली. इतर तीनही सदस्यांनी मराठीमध्ये ईश्वराच्या साक्षीने शपथ घेतली. शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी सावित्रीबाई फुलेंच्या वेशभूषेत राज्यसभेत आल्या होत्या. त्यांच्या या वेशभूषेची दिवसभर चर्चा होत होती. वाघमारे यांनी शपथ घेताना महापुरुषांची तसेच राजकीय नेत्यांची नावे घेतल्याने त्यांना थांबवण्यात आले. त्यानंतर वाघमारे यांनी विहित नमुन्यामध्ये पुन्हा शपथ घेतली.
राज्यातील सातही खासदारांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पार्थ पवार या दोन सदस्यांनी अजून शपथ घेतलेली नाही. पार्थ पवार हे ९ एप्रिल रोजी शपथ घेण्याची शक्यता आहे. याशिवाय, तामिळनाडूतील सहा, पश्चिम बंगालमधील पाच आणि ओडिशामधील तीन सदस्यांचा समावेश होता.
