Sharad Pawar on Donald Trump Tariff Announcement: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री उशीरा भारत व अमेरिका यांच्यात व्यापार करार झाल्याचं जाहीर केलं. त्यांच्या TRUTH या सोशल मीडियावरील अधिकृक अकाऊंटवरून त्यांनी ही पोस्ट केली. या पार्श्वभूमीवर भारताच्या राजकीय वर्तुळात नाराजी व्यक्त होत असून विरोधकांकडून यावरून नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेबाबत मोठी चिंता व्यक्त केली आहे. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी लोकसभेत मनोज नरवणेंच्या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादाबरोबरच डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेवरही भाष्य केलं.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केली घोषणा?

रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास नरेंद्र मोदींनी सहमती दर्शवल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. शिवाय, भारताकडून अमेरिकेवर आकारण्यात येणारं टॅरिफ टप्प्याटप्प्याने शून्यावर नेण्याचंही या करारात मोदींनी मान्य केल्याचं ट्रम्प यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

“मोदी हे माझे एक महान मित्र असून त्यांच्या देशाचे शक्तिशाली व आदरणीय नेते आहेत. आम्ही अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यात व्यापारविषयक बाबी व रशिया आणि युक्रेनमधील युद्धसमाप्तीसाठी प्रयत्न करण्याचाही समावेश होता. रशियाकडून तेल खरेदी बंद करण्यास त्यांनी सहमती दर्शवली आहे. त्याऐवजी बऱ्याच प्रमाणात अमेरिका व बहुधा व्हेनेझुएलाकडून ते तेल खरेदी करतील. यामुळे युक्रेनमधील युद्ध संपण्यास मदत होईल. या करारानुसार अमेरिकेकडून भारतावर २५ टक्क्यांऐवजी आता १८ टक्के टॅरिफ आकारलं जाईल. त्याचवेळी भारताकडून अमेरिकेवर आकारल्या जाणाऱ्या टॅरिफचं प्रमाण टप्प्याटप्प्याने शून्यापर्यंत नेण्यासाठी ते प्रयत्न करतील. अमेरिकेत उत्पादित होणाऱ्या ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी, कोळसा व इतर अनेक उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची बांधिलकी दर्शवली आहे”, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांनी व्यक्त केली चिंता!

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेवर शरद पवारांनी चिंता व्यक्त केली आहे. “अमेरिकेनं भारतावर आकारलेल्या टॅरिफमध्ये काही प्रमाणात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मला काही गोष्टींची चिंता आहे. त्यात कृषी क्षेत्रात अमेरिकेला जागतिक पातळीवर निर्यात करता येईल अशी तरतूद आहे. ही तरतूद भारतीय शेतीच्या दृष्टीने काळजीची आहे. अमेरिका एक शक्तिशाली देश आहे. त्यांची आर्थिक ताकद जास्त आहे. त्यामुळे त्यांनी एखाद्या महत्त्वाच्या उत्पादन वस्तूची निर्यात अनेक देशांमध्ये करायला सुरुवात केली, तर त्याचा परिणाम त्या देशातल्या त्या क्षेत्रावर विपरीत होतो. ती स्थिती भारतीय कृषीच्या येऊ नये अशी माझी अपेक्षा आहे”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

राहुल गांधींना संधी द्यायला हवी होती – शरद पवार

दरम्यान, माजी लष्करप्रमुख मनोज नरवणेंच्या पुस्तकात चीनकडून भारतीय भूमीवर करण्यात आलेल्या अतिक्रमणाचा उल्लेख करण्यात आला आहे. या पुस्तकाबाबत बोलण्यास लोकसभेत राहुल गांधींनी परवानगी नाकारल्यानंतर मोठा गोंधळ झाला. यासंदर्भात शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट शब्दांत सांगितली आहे.

“मनोज नरवणे हे देशाचे लष्करप्रमुख होते. त्यांनी काही विधान केलं असेल आणि त्याचा उल्लेख सदनात विरोधी पक्षनेते करत असतील, तर तो त्यांचा अधिकार आहे. ती संधी त्यांना द्यायला हवी होती. आज कारण नसताना देशात संशयाचं वातावरण तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लष्करप्रमुखांनी काहीतरी लिहून ठेवलं आहे याचा अर्थ काहीतरी चिंतेची स्थिती आहे. याची चर्चा झाली असती, तर लोकांना वास्तव चित्र समजलं असतं.समजा पुस्तक प्रकाशित झालेलं नाही आणि माझ्या हातात कॉपी आहे, ती मी दाखवली. अध्यक्षांनी सांगितलं की ऑथेंटिक करा, ती केली. मग त्याला विरोध करण्याचं कारण काय?”, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला.