बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जदयू आता एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. या घोषणेमुळे जदयूचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांचा चांगलाच तिळपापड झाला आहे, नितीशकुमारांनी बिहारच्या जनतेची फसवणूक केली आहे, हिंमत असेल तर त्यांनी मला जदयूमधून हाकलून दाखवावं असे खुलं आव्हानच यादव यांनी नितीशकुमारांना दिलं आहे. आम्ही अजूनही महाआघाडीचाच एक भाग आहोत असं शरद यादव छातीठोकपणे सांगत आहेत त्यामुळे जदयूमध्ये शरद यादव आणि नितीशकुमार यांच्या गटांमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झालं आहे.

बिहारच्या कृष्ण मेमोरियल हॉलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद यादव बोलत होते. एकीकडे हा कार्यक्रम सुरू असतानाच शरद यादव आणि राजद समर्थकांनी आज मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी नितीशकुमार समर्थक आणि शरद यादव समर्थक यांच्यात बाचाबाची आणि वादावादी झाली, ज्याचं रूपांतर हाणामारीत झालं त्यानंतर पोलिसांना येऊन सगळी परिस्थिती आटोक्यात आणावी लागली. या घटनेनंतर नितीशकुमारांच्या घराबाहेरचा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तिथली परिस्थिती आटोक्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान नितीशकुमार यांनी बिहारच्या जनतेचा विश्वासघात केला आहे अशी घणाघाती टीकाही शरद यादव यांनी केली आहे. नितीशकुमार यांनी महाआघाडीसोबतही विश्वासघात केला आहे, बिहारमध्ये आज पुराचं थैमान आहे, लोकांचे हाल होत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत, लव्ह जिहादची प्रकरणं समोर येत आहेत; मात्र या सगळ्याशी नितीशकुमारांना घेणंदेणं नाही, ते फक्त राजकारण करण्यात रमले आहेत अशीही टीका यादव यांनी केली आहे. ‘जनता दल यूनायटेड’ स्थापन करण्यात माझा सिंहाचा वाटा आहे आणि आता नितीशकुमारांचे समर्थक म्हणतात हा पक्षच माझा नाही, या वक्तव्याला काय अर्थ आहे असाही प्रश्न शरद यादव यांनी उपस्थित केला आहे.

शरद यादव यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समाचार घेतला आहे, २०१४ मध्ये नोकरीच्या २ कोटी संधी निर्माण होतील असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं  ते हवेत विरलं का? लोकशाहीत जी आश्वासनं दिली जातात ती पाळावीही लागतात नाहीतर जनता तुम्हाला माफ करत नाही असंही शरद यादव यांनी मोदींना सुनावलं आहे. नितीशकुमार आणि सुशील मोदी या दोघांचे हात भ्रष्टाचारात बरबटले आहेत, त्यातून वाचण्यासाठीच नितीशकुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर नाक घासत गेले असाही आरोप शरद यादव यांनी केला आहे.

एकीकडे शरद यादव एवढे आक्रमक झालेले असताना जदयूचे ज्येष्ठ सदस्य के.सी. त्यागी यांनी मात्र शरद यादवांवर टीकेची तोफ डागली आहे. नितीशकुमारांना जनता ओळखते त्यामुळेच बिहारच्या जनतेनं त्यांना पाठिंबा दिला आहे. शरद यादव एकटे पडले आहेत त्यांना आपलं आता काय होणार? याची भीती वाटते आहे म्हणून ते नितीशकुमारांच्या विरोधात बोलत आहेत असंही त्यागी यांनी म्हटलं आहे.