नियंत्रण रेषेवर शिलान्यास समारंभ

श्रीनगर, : सध्या पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीत असलेल्या शारदा पीठाची यात्रा पुन्हा सुरू होण्याची आशा काश्मीरमधील भाविकांना वाटत आहे. शारदा पीठ हे प्राचीन हिंदू विद्यापीठ आहे. कुपवाडा येथील मंदिराच्या तसेच धर्मशाळेच्या पुनर्उभारणीसाठी ‘शारदा वाचवा समिती’तर्फे शुक्रवारी नियंत्रण रेषेवर टीटवल या ठिकाणी शिलान्यास करण्यात आला.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या दारक्सान अन्द्राबी यांच्या हस्ते हा शिलान्यास झाला. हे ठिकाण १९४७ पूर्वी शारदा यात्रेसाठी तळ म्हणून प्रसिद्ध होते. अन्द्राबी या केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्या अखत्यारीतील वक्फ विकास समितीच्या अध्यक्षा आहेत. शारदा वाचवा समितीचे प्रमुख रवींद्र पंडिता यांनी सांगितले की, कर्तारपूर साहिब या ठिकाणी जाणारा मी पहिला काश्मिरी आहे. जर भारत आणि पाकिस्तान हे कर्तारपूर साहिबसाठी काही व्यवस्था करू शकतात, तर मग शारदा पीठासाठी का नाही? मी कर्तारपूर साहिबची यात्रा करू शकतो, मग शारदा पीठाची का नाही, असा सवाल त्यांनी केला.  

ज्ञानाची देवता मानल्या जाणाऱ्या सरस्वती म्हणजेच शारदेचे हे ठाणे आहे. नीलम खोऱ्यात ख्रिस्तपूर्व २७३ मध्ये या पीठाची स्थापना झाल्याचे मानले जाते. म्हणजेच तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठापेक्षाही ते प्राचीन असल्याचा दावा केला जातो. हे विद्यापीठ असले तरी तेथील मंदिराची वार्षिक यात्रा महाराजा प्रताप सिंह आणि रणबीर सिंह यांच्या कारकीर्दीत प्रसिद्धीस आली होती. १९४७ मध्ये फाळणीनंतर ही यात्रा खंडित झाली आणि मंदिरही दुर्लक्षित झाले. सध्या लोकांना सीमा ओलांडून जाण्यास परवानगी नसली तरी लवकरच ते शक्य होईल, अशी आशा असल्याचे पंडिता यांनी सांगितले. सध्याच्या नियमावलीत बदल करावा. काश्मीरच्या दोन्ही भागांत असलेल्या लोकांना त्यांच्या धार्मिक स्थळांच्या यात्रेस मुभा द्यावी. मुस्लीम असल्यास हजरतबल आणि चरार शरीफला जाण्याची परवानगी द्यावी, तर येथील लोकांना शारदा पीठ आणि गुरुद्वारा अली बेग येथे जाण्यास आडकाठी नसावी, अशी मागणी त्यांनी केली. शारदा यात्रा पुन्हा सुरू करण्यासाठी पंडिता हे अनेक वर्षे भारत आणि पाकिस्तान सरकारकडे प्रयत्न करीत असून त्यांनी दोन्ही बाजूंच्या लोकांचा समावेश असलेली समिती स्थापन केली आहे.

त्यांच्याच प्रयत्नाने पाकव्याप्त काश्मीरमधील न्यायालयाने शारदा पीठाच्या जागेवरील अतिक्रमणे रोखण्याचा आदेश देत हे स्थळ तेथील पुरातत्त्व खात्याच्या निगराणीखाली आणले आहे.

मुस्लिमांचा पुढाकार..

टीटवल भागातील मुस्लिमांनी शारदा यात्रेच्या तळाची जुनी जागा शोधून काढली असून त्यांनीच पंडिता यांच्याशी संपर्क साधला. याच मुस्लिमांनी या जागेवर भराव टाकण्यातही मदत केली. तेथे जाऊन शारदा पीठ बचाव समितीने सुमारे पाऊण एकर जागा ताब्यात घेतली आहे. तेथे १९४७ पूर्वी एक मंदिर आणि गुरुद्वारा होते. तेथे आता मंदिर आणि धर्मशाळा बांधली जाणार आहे, अशी माहिती शारदा बचाव समितीचे पंडिता यांनी दिली.