पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली न्यायालयाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार शशी थरुर यांची आरोपातून मुक्तता केली आहे. विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी आभासी सुनावणी वेळी हा निकाल जाहीर केला. सविस्तर तपशील हाती आलेला नाही.

निकाल जाहीर झाल्यानंतर थरुर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, आपण न्यायाधीशांचे आभारी आहोत. या प्रकरणात आपली गेली साडेसात वर्षे छळवणूक झाली पण आता दिलासा मिळाला आहे. अखेर न्यायाचाच विजय झाला आहे.

आपल्या न्यायपद्धतीत ज्या प्रक्रियेला तोंड द्यावे लागते ती छळवणूकच असते. पण आपल्याला प्रकरणात शेवटी न्याय मिळाला आहे. आता आम्हाला सुनंदाच्या मृत्यूच्या दु:खात मुक्तपणे सामील होता येईल. माझ्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यानंतर जे दुष्टचक्र माझ्याविरोधात सुरू झाले ते आता संपले आहे. माझ्यावर या प्रकरणात अनेक निराधार आरोप करण्यात आले. माध्यमांनीही बदनामी करणाऱ्या बातम्या दिल्या. पण भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास कायम होता त्याचाच आज विजय झाला आहे, असे थरूर यांनी म्हटले आहे.

युक्तिवादावेळी पोलिसांनी थरूर यांच्यावर कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अन्वये खटला दाखल करण्याची मागणी केली होती. त्यावेळी ज्येष्ठ वकील विकास पहवा यांनी थरुर यांची बाजू मांडताना सांगितले की, विशेष चौकशी समितीने जी चौकशी केली आहे त्यात शशी थरुर यांच्या विरोधातील आरोप फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांची या प्रकरणातून मुक्तता करावी.

थरुर यांच्या विरोधात कुठलाही पुरावा मिळालेला नाही. त्यांनी सांगितले की, पुष्कर व त्यांच्या कुटुंबीयांनी सुनंदा आत्महत्येमुळे मरण पावलेली नाही असे म्हटले आहे त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करणे योग्य नाही. पहवा यांनी असा दावा केला की, शवविच्छेदन व वैद्यकीय अहवालात आत्महत्या किंवा मनुष्यवध याचे कुठलेही पुरावे मिळालेले नाहीत. पहवा यांनी निकालानंतर सांगितले की, पोलिसांनी थरुर यांच्यावर सुनंदाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी केलेले आरोप चुकीचे होते. सायकॉलॉजिकल ऑटोपसी रिपोर्टमध्येही थरुर यांना मनुष्यवध व आत्महत्येस प्रवृत्त करणे या आरोपातून मुक्त करण्यात आले होते. पुष्कर या १७ जानेवारी २०१४ रोजी एका आलिशान हॉटेलात रात्री मृतावस्थेत सापडल्या होत्या.