एकटा काँग्रेस पक्ष मोदी आणि भाजपाला पराभूत करू शकतो का? शशी थरूर म्हणतात…

एकटा काँग्रेस पक्ष २०२४ च्या निवडणुकीत मोदी आणि भाजपाला पराभूत करू शकतो का? असा प्रश्न विचारला असता थरूर यांनी यावर उत्तर दिलंय.

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. नरेंद्र मोदींचा ‘मैं, मैं, मैं’चा जप २०२४ लोकसभा निवडणुकीत निरुपयोगी ठरेल, असं मत शशी थरूर यांनी व्यक्त केलं. यानंतर एकटा काँग्रेस पक्ष २०२४ च्या निवडणुकीत मोदी आणि भाजपाला पराभूत करू शकतो का? असा प्रश्न विचारला असता थरूर यांनी सध्या तरी तसं होणं कठीण जाईल, असं उत्तर दिलं. तसेच सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यास मोदी आणि भाजपाचा पराभव अगदी शक्य असल्याचं म्हटलं. ते एनडीटीव्हीशी बोलत होते. त्याचं नवं पुस्तक ‘प्राईड, प्रिज्युडिस अँड पंडिट्री’ रिलीज झालंय. त्या पार्श्वभूमीवर ते सध्या माध्यमांशी बोलत आहेत.

शशी थरूर म्हणाले, “सध्या काँग्रेस पक्षाची जी स्थिती आहे त्यावरून एकट्या काँग्रेसने भाजपा आणि मोदींना पराभूत करणं कठीण जाईल. आमच्याकडे सध्या संसदेत केवळ ५२ खासदार आहेत. आम्हाला २७२ खासदारांची गरज आहे. काँग्रेसने प्रादेशिक पक्षांसोबत हातमिळवणी केल्यास मोदी आणि भाजपाचा पराभव अगदी शक्य आहे,” असं मत थरूर यांनी व्यक्त केलं.

“मोदींच्या काळात बेरोजगारी सर्वाधिक”

“मोदी सरकारने विकास आणि बेरोजगारी हटवण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यांना ही आश्वासनं पूर्ण करता आलेली नाही. त्यांच्या काळात बेरोजगारी सर्वाधिक आहे. तसेच अर्थव्यवस्था देखील कोलमडली आहे,” असं थरूर यांनी सांगितलं.

“मोदींना २०१९ लोकसभा निवडणुकीत बालाकोट एअरस्ट्राईकचा फायदा”

शशी थरूर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी २०२४ मध्ये पुन्हा सत्तेत येणं कठीण असणार आहे. यामागे २ कारणं आहेत. पहिलं त्यांच्याकडे मागील साडेसात वर्षात काय काम केलं हे सांगण्यासारखं विशेष काही नाही. दुसरं मोदी सरकार तरुणांना नोकरी देऊ शकलं नाही, मग लोक त्यांना का मतदान करतील. मोदींना २०१९ लोकसभा निवडणुकीत बालाकोट एअरस्ट्राईकचा फायदा झाला, मात्र असं प्रत्येकवेळी होत नाही.”

“प्रत्येक गोष्टीत मला सगळं माहिती आहे हे सांगून उपयोग नाही”

“२०२४ मध्ये निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्यासमोर विरोधी पक्षांकडून दुसरा कोणता चेहरा असेल असा प्रश्नही थरूर यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी मोदींचा ‘मैं, मैं, मैं’चा जप २०२४ मध्ये निरुपयोगी ठरेल असं म्हटलं. “‘मैं, मैं, मैं” म्हणणं आणि प्रत्येक गोष्टीत मला सगळं माहिती आहे, मी प्रत्येकाच्या अडचणी दूर करू शकतो असं सांगून प्रत्येकवेळी उपयोग होत नाही. त्यांच्या बोलण्यात किती तथ्य आहे हे आता लोकांनी पाहिलंय,” असं शशी थरूर यांनी सांगितलं.

“निश्चलनीकरणामुळे निर्माण झालेलं संकट सर्वांसमोर”

“निश्चलनीकरणामुळे निर्माण झालेलं संकट तर सर्वांच्या समोर आहे. विरोधी पक्षांकडे “मैं नहीं, हम” ही घोषणा आहे. यातील ‘हम’ म्हणजे सर्व भारतीयांसाठी आहे. देशभरातील काही अनुभवी राजकीय चेहरे देशाच्या सेवेसाठी पुढे येतील. नरेंद्र मोदी विरुद्ध एक चेहरा अशी लढाई का करायची?” असा सवाल थरूर यांनी केला.

“मोदींविरोधात सर्वजण एकत्र आले तर ६३ टक्के होतात”

शशी थरूर म्हणाले, “जर देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आले तर त्यांचं संख्याबळ मोठं असेल. मोदींना मागील वेळी ३७ टक्के मतं मिळाली होती. मात्र, त्यांच्या विरोधात सर्वजण एकत्र आले तर ६३ टक्के होतात. हा खूप मोठा आकडा आहे.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shashi tharoor answer whether congress will defeat bjp and modi in 2024 election pbs

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या