Shashi Tharoor backs Digvijaya Singh : काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या एका विधानावरून सध्या चांगलाच गदारोळ सुरू आहे. यादरम्यान आता काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी दिग्विजय सिंह यांच्या पक्षांतर्गत सुधारणेच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच त्यांनी पक्षातील संघटन मजबूत करण्याच्या आवश्यकतेवरती यावेळी भर दिला आहे.

गेल्या आठवड्यात सिंह यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात सुधारणा आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणाची गरज बोलून दाखवली होती. यामध्ये त्यांनी विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांचा देखील या पोस्टमध्ये उल्लेख केला होता. मात्र पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याच्या अशा जाहीर विधानामुळे काँग्रेसवर नामुष्की ओढवली असून, पक्षातील अनुभवी नेत्यांमधील वाढता असंतोषही समोर आला आहे.

दिग्विजय सिंह यांनी काल भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केल्यानेही वाद पेटला आहे. काल लालकृष्ण अडवाणी यांच्या शेजारी जमिनीवर बसलेल्या नरेंद्र मोदी यांचा एक जुना फोटो दिग्विजय सिंह यांनी ‘एक्स’वर पोस्ट केला आहे. “कशा प्रकारे RSS व जनसंघाचा एक सामान्य कार्यकर्ता नेत्यांच्या चरणी बसून मुख्यमंत्री व देशाचा पंतप्रधान झाला. ही संघटनेची शक्ती आहे”, असे म्हणत सिंह यांनी भाजपा आणि आरएसएसच्या इकोसिस्टमचे कौतुक केले. दरम्यान सिंह यांनी या पोस्टबद्दल स्पष्टीकरण देताना ते आरएसएस-भाजपाचे कट्टर विरोधक असल्याचे म्हटले, मात्र तोपर्यंत त्यांच्या विधानाचा व्हायचा तो परिणाम झाला होता.

थरूर काय म्हणाले?

आपल्याच पक्षातील नेत्यांशी मतभेद असल्यावरून गेल्या काही दिवसांपासून शशी थरूर हे चर्चेत आहेत. थरूर यांना सिंह यांच्याशी काही बोलणे झाले का? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. काँग्रेसच्या १४०व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला जात असताना थरूर म्हणाले की, “आम्ही मित्र आहोत, आणि संवाद होणे हे स्वाभाविक आहे. संघटना मजबूत केलीच पाहिजे – यात काहीच शंका नाही.”

पक्षाच्या शंभरहून अधिक वर्षांहून अधिक दीर्घ इतिहासाकडे बोट दाखवत थरूर माध्यम प्रतिनिधींना म्हणाले की, त्या इतिहासातून अजून शिकण्यासारखे बरेच काही आहे. “आम्हाला (काँग्रेस) १४० खूप महत्त्वाची आहे. हेच तर्कसंगत आहे. आपल्या संघटनेत शिस्त असलीच पाहिजे.”