shashi tharoor clarifies stand on leaving congress : काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी शुक्रवारी काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर मौन सोडले असून आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी थरूर यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. थरूर यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगत पक्षाबद्दल त्यांची निष्ठा बोलून दाखवली आहे.
जेव्हा थरूर यांना पक्ष सोडण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावण्याबाबत विचारण्यात आले, तेव्हा थरूर यांनी आपण पक्षातच राहाणार असल्याचे स्पष्ट केले. “मी काँग्रेसमध्ये आहे आणि मी कुठेही जाणार नाही. मी केरळमधील निवडणूक प्रचाराचा भाग असेन आणि युडीएफच्या विजयासाठी काम करेन. आगामी केरळ विधानसभा निवडणुकीत मी आघाडीवर काँग्रेसचे नेतृत्व करेन,” असे थरूर यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
तिरुवनंतपुरम येथून काँग्रेसचे खासदार असलेले शशी थरूर यांनी राहुल गांधी यावेळी राहुल गांधी यांचे कौतुक देखील केले. ते म्हणाले की, “राहुल गांधी हे एक स्पष्ट राजकीय भूमिका असलेले नेते आहेत. ते जातीयवादाचा विरोध करणारे नेते आहेत.”
थरूर यांनी स्पष्ट केले की पक्षाची भूमिका सर्वोच्च असली तरी, ते कधीकधी त्यांची वैयक्तिक मते मांडत असतात. “ज्या प्रकरणात पक्षाची निश्चित अशी एक भूमिका असते, तेथे त्याबाबत मी दुसरे वेगळे मत मांडत नाही. मात्र काही परिस्थितींमध्ये, मी माझे वैयक्तिक मत मांडतो. विकासाच्या बाबतीत जेव्हा मला चांगल्या गोष्टी दिसतात, तेव्हा मी त्या नमूद करतो,” असे थरूर म्हणाले.
अंतर्गत राजकारणापेक्षा आपले लक्ष हे राष्ट्रीय मुद्द्यांकडे आहे, असेही वरिष्ठ काँग्रेस नेते थरूर पुढे बोलताना म्हणाले. “मला राजकारणाबद्दल चर्चा करायची नाही, मला देशाचे मुद्दे मांडायचे आहेत. मी हे २००९ पासून सांगत आलो आहे.” पक्षाच्या अधिकृत भूमिकेला विरोध करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असेही थरूर यांनी जोर देऊन सांगितले.
त्यांच्या निष्ठेबद्दल वारंवार संशय का घेतला जातो? असा प्रश्न उपस्थित करत थरूर म्हणाले की, “मी काँग्रेसमध्येच राहाणर आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता का आहे? असा प्रश्न फक्त मलाच का विचारला जातो? मी भक्कमपणे काँग्रेसबरोबरच राहणार आहे.”
खरगे आणि राहुल गांधी यांना भेटल्याच्या दुसऱ्याच दिवशी थरूर यांचे हे विधान आले आहे. या तीन नेत्यांमध्ये एक तास ४५ मिनिटे इतका वेळ बैठक झाली. महत्त्वाच्या केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या आठवड्यात थरूर हे केरळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका महत्त्वाच्या पक्ष बैठकीला गैरहजर राहिले होते. तेव्हा थरूर हे राहुल गांधी यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात होते.

