राष्ट्रगीत ‘जन गण मन’प्रमाणेच आता राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’चा अवमान करणे हादेखील कायदेशीर गुन्हा ठरणार आहे. यासंदर्भातील ‘राष्ट्रीय सन्मानावमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक २०२६’ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. मात्र, या निर्णयामुळे आता नवीन राजकीय वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका करत व्यावहारिक अडचणींकडे लक्ष वेधले आहे. “अतिउत्साही लोकांनी मानवी स्वभावाचा विचार न करता हा निर्णय घेतला आहे,” अशी टीका थरूर यांनी केली आहे.

“१२ मिनिटं उभं राहणं शक्य आहे का?” – शशी थरूर यांचं गणित

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर आपली भूमिका मांडताना शशी थरूर यांनी या निर्णयामागील अडचणींचा पाढा वाचला:

  • वेळेचे गणित: ‘जन गण मन’ या राष्ट्रगीतासाठी ५२ सेकंद शांत आणि आदरपूर्वक उभे राहावे लागते. मात्र, संपूर्ण ‘वंदे मातरम’ गाण्यासाठी ३ मिनिटे १० सेकंदांचा कालावधी लागतो.
  • राज्यगीतांची भर: तमिळनाडूसारख्या राज्यांमध्ये अधिकृत कार्यक्रमात राज्यगीतही गायले जाते, ज्यासाठी अतिरिक्त २ मिनिटे लागतात.
  • अतिरिक्त वेळ: यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि शेवटी मिळून नागरिकांना तब्बल १२ मिनिटे सावधान स्थितीत उभे राहावे लागेल.

“कायद्याचा बडगा दाखवून लोकांच्या मनात आदर आणि संयम निर्माण करता येतो का? राष्ट्रीय गीताचा आदर वाढवण्याच्या उद्देशाने आणलेल्या या कायद्याचा उलटा परिणाम तर होणार नाही ना?” अशी भीती थरूर यांनी व्यक्त केली आहे.

‘वंदे मातरम’च्या सर्व कडव्यांचा व्यावहारिक पेच

आपली भूमिका स्पष्ट करताना थरूर म्हणाले की, ते राष्ट्रगान आणि राष्ट्रीय गीत या दोन्हीचा मनापासून आदर करतात. “मला राष्ट्रगान पूर्ण येते आणि ‘वंदे मातरम’ची पहिली दोन कडवी मी सहज गाऊ शकतो. परंतु, आतापर्यंत कधीही अनिवार्य नसलेली उर्वरित चार कडवी बहुतांश लोकांना माहीतही नाहीत. राष्ट्रीय गीताबाबत आदर वाढवण्याच्या हेतूने हा कायदा आणला गेला असला, तरी मानवी स्वभाव आणि व्यावहारिक वास्तव न लक्षात घेतल्यामुळे या निर्णयाचा मूळ उद्देशच मारला जाण्याची भीती आहे.”

शासकीय कार्यक्रमांच्या वेळेचे नियोजन आणि उपस्थितांचा संयम या दृष्टीने हा नवा नियम कितपत योग्य ठरेल, यावर आता राजकीय व सामाजिक स्तरावर वादविवाद रंगण्याची शक्यता आहे.

अपराध केल्यास काय शिक्षा होणार?

नवीन कायद्यानुसार, ‘वंदे मातरम’चे गायन रोखणे किंवा गायन चालू असताना त्यात अडथळा निर्माण करणे हा गंभीर गुन्हा मानला जाईल.

  • शिक्षेची तरतूद: असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला ३ वर्षांपर्यंतचा कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
  • दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास: जर एखाद्या व्यक्तीने हा गुन्हा पुन्हा केला, तर त्याला किमान १ वर्षाच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.

याआधी १९७१ च्या मूळ कायद्यात केवळ राष्ट्रगीत ‘जन गण मन’च्या अवमानाबाबतच शिक्षेची तरतूद होती. ‘वंदे मातरम’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा असूनही असा कोणताही थेट कायदेशीर आधार उपलब्ध नव्हता. हीच त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने कलम ३ मध्ये सुधारणा करून ‘वंदे मातरम’चा यामध्ये समावेश केला आहे.

गृह मंत्रालयाचे महत्त्वाचे निर्देश आणि नवीन नियमावली

गृह मंत्रालयाने याआधीच ‘वंदे मातरम’च्या गायनासंदर्भात एक विस्तृत नियमावली (प्रोटोकॉल) जारी केली आहे:

  • लाल किल्ल्यावरून प्रथमच गायन: यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून ‘वंदे मातरम’चे गायन केले जाणार आहे.
  • ६ कडवी आणि वेळ: अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम’ची सर्व ६ कडवी गायली जातील. यासाठी ३ मिनिटे १० सेकंदांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
  • प्राधान्यक्रम: कोणत्याही शासकीय कार्यक्रमात राष्ट्रगीत (जन गण मन) आणि राष्ट्रीय गीत एकत्र वाजवले किंवा गायले जाणार असल्यास, ‘वंदे मातरम’ प्रथम गायले जाईल.
  • आदर आणि शिस्त: राष्ट्रीय गीत सुरू असताना उपस्थितांना सावधान स्थितीत उभे राहणे बंधनकारक असेल.
  • शाळांमध्ये सुरुवात: देशातील सर्व शाळांमध्ये दैनंदिन कामकाजाची सुरुवात ‘वंदे मातरम’च्या समूहगायनाने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.