Shashi Tharoor on Veer Savarkar Award : काँग्रेस खासदार शशी थरूर यांना एचआरडीएस इंडिया या स्वयंसेवी संस्थेने ‘वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट अवॉर्ड २०२५’ देत असल्याची घोषणा केली आहे. मात्र, थरूर यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या पुरस्कारासाठी एकूण सहा जणांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती. त्यामधून संस्थेने थरूर यांची निवड केली आहे. शशी थरूर यांना प्रसारमाध्यमांमुळे या पुरस्काराबद्दल माहिती मिळाली. थरूर यांना जेव्हा समजलं की हा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे तेव्हा ते नाराज झाले. ते म्हणाले, “मला नुकतंच याबाबत समजलं आहे. परंतु, मी स्पष्ट करू इच्छितो की मी असा कोणताही पुरस्कार स्वीकारलेला नाही.”

शशी थरूर यांच्याकडून आयोजकांच्या बेजबाबदारपणावर बोट

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी तिरुवनंतपुरम येथे प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, या पुरस्कारासाठी माझ्या नावाची घोषणा करण्यापूर्वी आयोजकांनी किंवा संस्थेने मला विचारलं नाही आणि मी हा पुरस्कार स्वीकारलेलाही नाही.” चर्चा न करता, पूर्वकल्पना न देता या पुरस्कारासाठी नाव घोषित केल्याबद्दल शशी थरूर यांनी आयोजकांना बेजबाबदार ठरवलं आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा आज (१० डिसेंबर) नवी दिल्ली येथील एनडीएमसी कन्व्हेन्शन हॉलमध्ये होणार आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहोत.

“मला न विचारताच नाव घोषित केलं”

सदर पुरस्काराबाबत शशी थरूर यांनी एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की हा पुरस्कार, आयोजक, पुरस्कार देणारी संस्था किंवा कुठल्याही संबंधित व्यक्तीने याबाबत मला कुठलीही माहिती न देता घोषणा केली आहे. त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी होणं किंवा हा पुरस्कार स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

एचआरडीएस इंडिया ही संस्था वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट अवॉर्ड प्रदान करत आहे. संस्थेने आयोजित केलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपराज्यपाल मनोज सिन्हा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.